रत्नागिरी : गावातील सार्वजनिक ग्रंथालयांमुळे सर्वांना अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ तयार होते. वाचनातून विचारी आणि सृजनशील नागरिक घडतो आणि सार्वजनिक ग्रंथालय राबवत असलेल्या अवांतर उपक्रमातून, कवी संमेलन, आवडलेले पुस्तक परिसंवाद, लेखक - वाचक संवाद या कार्यक्रमातून समाज विकासाच्या विचारांना चालना मिळून, बळकट समाजाची निर्मिती होते, असे विचार आमदार संजय कदम यांनी मांडले.रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या ३९ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटनप्रसंगी कदम बोलत होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे जर काही प्रश्न असतील, तर तेही मी सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटनानंतरच्या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघामार्फ त देण्यात येणारे उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार अ. बा. वैद्य (दापोली), आनंद जाधव (लांजा) तर उत्कृ ष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार भक्ती कदम (दापोली) आणि विठोबा चव्हाण (राजापूर) यांना संजय कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष मनोज गोगटे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष झाल्याबद्दल कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनपर कार्यक्रमात प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमाला जोडूनच नॅशनल हायस्कूल, लाटवणच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित ग्रंथालय प्रतीनिधींसाठी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. व्यक्तिमत्व विकास या परिसंवादात ए. एच. इनामदार, शांता सहस्त्रबुद्धे, माधव गवाणकर हे सहभागी झाले होते. परिसंवादानंतर ग्रंथालय प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या शंकासमाधान या कार्यक्रमात गायकवाड, ग्रंथालय अधिकारी, रत्नागिरी आणि श्रीनिवास मंगलपल्ली यांच्यासह भाई कालेकर, मुरलीधर बोरसुतकर, श्रीकृष्ण साबणे, गजानन कालेकर, अ. बा. वैद्य, काशिनाथ चव्हाण, रमा जोग आदींनी सहभाग घेतला. अब्दुल कादिर अली खाचे यांनी आभार मानले. अधिवेशनासाठी जिल्ह्यातून १३० ग्रंथालय प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्रंथालयामुळे स्वास्थ्य : कदम
By admin | Published: February 09, 2015 9:58 PM