देवगड : दोन मोठी शस्त्रक्रिया करून पोटातील ४५-५० किलो प्लास्टिक बाहेर काढून मुटाटा येथे पाळेकरवाडी येथील गर्भवती म्हैशीला जीवदान देण्यात आले. म्हैशीच्या पोटातील मृत रेडकू आणि प्लास्टिक पिशव्या व कपडे बाहेर काढून पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी ५ तास अथक प्रयत्न करून यशस्वी शस्त्रक्रिया केली.
पाळेकरवाडी येथील शंकर पाळेकर यांची म्हैस गेल्या ६-७ दिवसांपासून प्रसुतीस आली होती. परंतु तिची प्रसूती होत नसल्याने पाळेकर यांनी तेथील स्थानिक डॉक्टर याना पाचारण केले असता त्यांनी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे याना पाचारण करण्याचा सल्ला दिला होता. डॉ.घोगरे यानी तत्काळ पाळेकर यांच्या म्हैशीची तपासणी केली असता त्या म्हैशीच्या गर्भाशयातील रेडकू मृत झाल्याचे निदर्शनास आले.यावेळी सिजरिंग करून ते रेडकू काढावे लागेल असे त्यांनी सांगितले होते. वेळ न दवडता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी तिच्या पोटात ४५ ते ५० किलोचे प्लास्टिक पिशव्या आणि कपडे निदर्शनास आले.
प्रसुतीस अडथळे येऊन ते रेडकू दोन दिवसापूर्वीच दगावले होते. यावेळी रुमीना टॉमी आणि सिजरींग अशी दोन मोठी ५ तासाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील मृत रेडकू आणि प्लास्टिक पिशव्या व कपडे बाहेर काढले.