कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत आहे. यातील कणकवली विधानसभा मतदार संघातील तब्बल १६६ मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण होणार आहे. विशेषतः निवडणूक रिंगणातील प्रमुख उमेदवार, तालुक्यातील बडे नेते यांच्या गावातील मतदान केंद्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मतदान केंद्रातील गडबड, बोगस मतदान आदींवर थेट नजर ठेवण्यासाठी ही यंत्रणा राबविण्यात येणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा मतदान प्रक्रीया अधिक पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. यापुर्वी जी मतदान केंद्रे संवेदनशिल होती. किंवा ज्या मतदानकेंद्रावरील मतदान प्रक्रीया पारदर्शक होणे अपेक्षित आहे. अशा मतदान केंद्राची निवड करण्यात आली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील एकूण १६६ केंद्रावर थेट प्रक्षेपण होणार आहे. हे प्रक्षेपण निवडणूक आयोगाला, मुख्य निवडणूक आयुक्तांना, लोकसभा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी यांना पाहता येणार आहे. यासाठी ज्या मतदानकेंद्राच्या परिसरात मोबाईलची फोरजी रेंज आहे. अशा ठिकाणी यंत्रणा असेल, यासाठी सध्या आयोगाने नेमलेल्या ठेकेदाराचे पथक मतदान केंद्राची पाहणी करीत आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या यादीनुसार त्या त्या केंद्रावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. थेट प्रक्षेपणासाठी केंद्राच्या प्रांगणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
Sindhudurg: कणकवली विधानसभा मतदारसंघातील १६६ मतदान केंद्रांवर होणार थेट प्रक्षेपण
By सुधीर राणे | Published: April 25, 2024 4:15 PM