लांजा : जंगलात भक्ष्य मिळत नसल्याने थेट गजबजलेल्या लोकवस्तीत रात्रीच्यावेळी कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनखात्याने जीवदान दिले; पण कुत्र्यासह विहिरीत पडलेल्या भुकेल्या बिबट्याने त्याचा मात्र फडशा पाडला. लांजा शहरामधील भटवाडी येथे बहुतांश घरे शासकीय कर्मचाऱ्यांची आहेत. महावितरण कंपनीमध्ये वायरमन म्हणून काम करणारे पांडुरंग नवशा वाघमारे येथे राहतात. त्यांच्या विहिरीचे बांधकाम अर्धवट असल्याने त्यावर जाळे टाकले होते.नेहमीप्रमाणे पांडुरंग वाघमारे यांची पत्नी सुशीला सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान पंप चालू करून विहिरीकडे गेल्या. तेव्हा विहिरीवरील जाळे फाटले असल्याचे त्यांना दिसले. विहिरीत डोकावले असता आत बिबट्या पडलेला दिसला. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. ग्रामस्थांनी विहिरीत बिबट्या असल्याची खातरजमा केली आणि तत्काळ वनखात्याला माहिती दिली. लांजाचे वनरक्षक लक्ष्मण गुरव, महादेव पाटील, अशोक सांडव, गोरखनाथ खेडेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती दिल्यानंतर राजापूरचे वनपाल सुधाकर गुरव, दामोदर गुरव, देवरुख वनपाल टी. व्ही. यादव, सागर गोसावी, वनरक्षक एस. आर. कोळेकर, दिलीप आरेकर, रत्नागिरीचे वनरक्षक उमेश आखाडे, विक्रम कुंभार, दाभोळे विभागाचे सुरेश उपरे, आदींसह वनक्षेत्रपाल अशोक लाड घटनास्थळी दाखल झाले.वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडला. बिबट्याने पिंजऱ्यात जाण्यास बराच वेळ घेतला. उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मादी जातीचा हा बिबट्या चार वर्षांचा असून, त्याची उंची ७५ सेमी, तर लांबी १७२ सेमी आहे. बिबट्याची पूर्ण वाढ झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. गोजीम यांनी बिबट्यावर औषधोपचार केले. या बिबट्याला प्रथम खेरवसे येथील शासकीय जंगलात नेऊन नंतर नैसर्गिक अधिवास चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)वनक्षेत्रपाल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. लांजा शहरातील निसर्ग संवर्धन संस्थेचे समीर जाधव, मंगेश पांचाळ, शिशिर फणसळकर, सुजित कांबळे, ऋषिकेश कोलते, योगेश आडविलकर, प्रशांत पांचाळ, संकेत साळुंखे, आदी नागरिकांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना विहिरीत पिंजरा सोडणे व सुरक्षित बिबट्याला बाहेर काढण्यासाठी मदत केली. बिबट्याबरोबर कुत्राही विहिरीत पडला होता. भुकेने व्याकूळ झालेल्या या बिबट्याने विहिरीत पडलेल्या कुत्र्याचा फडशा पाडला.
लांजात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By admin | Published: February 02, 2015 11:23 PM