खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटणजवळील शेर्पे राणेवाडीत शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कुत्र्यांच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या विहिरीत पडला. पिंजरा लावून वन विभागाने बिबट्याला रविवारी दुपारी विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांचा जोरजोरात भुंकण्याचा आवाज आला. विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज शरद तेली व दत्ताराम तेली यांच्या कुटुंबीयांना आला. घरातील एक महिला रविवारी सकाळी सहा वाजता विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. महिलेने टाकलेल्या कळशीत गढूळ पाणी आल्याने तिने विहिरीत डोकावून पाहिले. यावेळी बिबट्या असल्याचे तिने पाहिले. पोलीसपाटील विनोद शेलार, सरपंच निशा शेलार यांनी कणकवली वनपालांना याबाबत माहिती दिली. कणकवलीचे वनक्षेत्रपाल आर. एस. पाटील, वनपाल ना. ना. तावडे सकाळी नऊ वाजता पिंजरा घेऊन दाखल झाले. यावेळी दत्तगुरू पिळणकर, समृद्धी शिंदे, श्रीकृष्ण परीट, सादीक फकीर, शशिकांत साटम, प्रदीप पाटील, आर. डी. पाटील, अभिनंदन सावंत, मधुकर सावंत, बागवे, आदींचे पथकही त्यांच्यासोबत होते. पिंजरा मोठा असल्याने तो विहिरीत जात नव्हता. बाळू मेस्त्री यांनी तो पिंजरा कापून नवीन तयार केला. दुपारी १२.४० वाजता बिबट्याला बाहेर काढले. हा बिबट्या सहा ते सात वर्षांचा असून, तळकोकणातील मोठा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. (वार्ताहर)
विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By admin | Published: April 06, 2015 1:28 AM