वैभववाडी : खांबलवाडी धरणातून शुकनदीत सोडलेले पाणी काहीच तासांनंतर स्थानिक ग्रामस्थांनी बंधारा घालून रोखले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दरम्यान, पाणीपट्टी भरणारे नापणेतील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे पाण्यासाठी तगादा लावला आहे. या धरणाचे पाणी न सोडल्यास शेकडो एकरवरील ऊसशेती संकटात येणार आहे. याशिवाय काही नळपाणी योजनांनाही फटका बसणार आहे.शुकनदीचे पात्र कोरडे पडल्याने सोनाळी, नापणे, कुसूर, उंबर्डे-नायदेवाडी, दिगशी, तिथवली या गावातील ऊसशेतीवर संकट ओढवले असून नदीकाठच्या नळपाणी योजना अडचणीत आहेत. त्यामुळे नापणे परिसरातील शेतकऱ्यांनी खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्याची मागणी लघुपाटबंधारे विभागाकडे केली होती.
त्यानुसार लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नंदकुमार साळवी यांच्या उपस्थितीत मंगळवारी धरणाचे पाणी शुकनदीत सोडण्यात आले. परंतु खांबलवाडीतील ग्रामस्थांनी अर्धवट स्थितीतील कालवा तातडीने पूर्ण करावा, शेतीला सुलभ पद्धतीने पाणी पोहोचण्यासाठी नाल्यांमध्ये काँक्रीटचा बंधारा बांधावा, अशा मागण्या शाखा अभियंता साळवी यांच्यासमोर ठेवत धरणाचे पाणी थेट नदीत सोडण्यास विरोध दर्शविला.त्यामुळे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकमत झाले नाही. तरीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मंगळवारी सायंकाळी धरणाचे पाणी शुकनदीत सोडण्यात आले. परंतु त्यानंतर काही तासांतच स्थानिक ग्रामस्थांनी नाल्यात बंधारा बांधून नदीला सोडलेले धरणाचे पाणी रोखले असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, पाणी बंद झाल्यामुळे पाणीपट्टी भरणारे नापणेतील शेतकरी काहीसे आक्रमक झाले आहेत. पाण्याअभावी शेकडो एकरवरील ऊसशेती संकटात आहे. धरणात पाणीसाठा असताना पाण्याअभावी ऊसशेती करपली तर नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.
धरणाच्या पाण्याचा प्रश्न वेगळे वळण घेत असल्याने अधिकाऱ्यांनीही सावध भूमिका घेतली असून त्यासंबंधीचा अहवाल शाखा अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांमार्फत अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशावर सहा गावातील ऊसशेती आणि नदीकाठच्या नळपाणी योजनांचे भवितव्य अवलंबून आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्यात आले होते. परंतु काही ग्रामस्थांनी ते बंद केले आहे. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जसे आदेश येतील त्यानुसार धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे फोंडाघाट लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नंदकुमार साळवी यांनी दूरध्वनीवरुन स्पष्ट केले आहे.