सिंधुदुर्गनगरी : महसूल प्रशासनाने मालवण पंचायत समितीच्या ताब्यातील गोडाऊनला टाळे ठोकल्याने कृषी विभागाची कृषी अवजारे अडकून पडली आहेत. याचे पडसाद गुरुवारी कृषी समिती सभेत उमटले. सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ गोडाऊन खुले करा अशा सूचना केल्या.जिल्हा परिषद कृषी समितीची सभा सभापती व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात गुरुवारी पार पडली. यावेळी रेश्मा जोशी, प्रमोद सावंत, योगिता परब, समीर नाईक, मधुसूदन बांदिवडेकर, दिलीप रावराणे, विभावरी खोत, वैशाली रावराणे, सीमा परुळेकर आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.मालवण येथील पंचायत समितीच्या ताब्यातील गोडाऊनमध्ये कृषी विभागाचे कृषी अवजारे, महिला व बालविकास विभागाचे साहित्य तसेच बांधकाम विभागाचे साहित्य गेली अनेक वर्षे ठेवण्यात येत आहेत. याबाबत या इमारतीचा टॅक्स जिल्हा परिषदेकडून भरला जात आहे. असे असताना महसूल प्रशासनाने या गोडाऊनला कृषी विभागाचे टाळे तोडून स्वत:चे कुलूप लावून सीलबंद केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासह विविध विभागाचे साहित्य या गोडाऊनमध्ये अडकून पडले आहे. शेतकऱ्यांना पावसाळी कालावधीत वाटप करण्याचे साहित्य अडकून पडल्याने आजच्या कृषी समिती सभेत यावर जोरदार चर्चा झाली. जिल्हा महसूल प्रशासनाच्या कारवाईबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर मालवण तहसीलदार यांच्याकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले साहित्य तत्काळ खुले करावे अशा सूचना सदस्यांनी केल्या. मालवण गोडाऊन सील प्रकरणामुळे जिल्हा महसूल प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन अशा नव्या वादाची ठिणगी पेटली असून या वादात शेतकऱ्यांसाठीचे साहित्य अडकून पडल्याची बाब आजच्या कृषी समिती सभेत उघड झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सांगितले.जिल्ह्यात मिश्र खतांचा आणि युरिया खताचा तुटवडा भासत असल्याचे सांगत सदस्य मधुसूदन बांदिवडेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले असता जिल्ह्यासाठी १७४०० मेट्रीक टन खताची शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत ८ हजार मेट्रीक टन खत उपलब्ध झाले आहे. तर येत्या दोन दिवसात आणखी ५ हजार मेट्रीक टन खत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही अशी माहिती कृषी विभागाने दिली.(प्रतिनिधी)पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कारसावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील प्रगतशील शेतकरी उत्तम परब यांनी भात पीक स्पर्धेत सहभागी होत प्रति हेक्टरी १२४ क्विंटल ३२ किलो एवढे भरघोस उत्पन्न घेऊन राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. याबद्दल गुरुवारी कृषी समिती सभेत सभापती रणजित देसाई यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ व कल्पवृक्षाचे झाड देऊन सत्कार करण्यात आला. तर यापुढे कोणत्याही सर्वोत्तम कामगिरीबाबत सत्कार करताना जिल्हा परिषदेमार्फत पुष्पगुच्छाबरोबरच एक झाड देऊन सत्कार करण्यात यावा असा ठराव सभेत करण्यात आला.कृषी विभागाचे चांगले सहकार्यजिल्हा परिषद कृषी विभागाकडून सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रगतशील शेतकरी उत्तम परब म्हणाले की, जिल्हा कृषी विभाग आणि सावंतवाडी कृषी अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी कृषी क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळविले आहेत. भात पीक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने मी भारावून गेलो आहे. कृषी सहाय्यक, कृषी मित्र, कृषी अधिकारी यांनी एकत्र येत शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन केल्यास नक्कीच कृषी क्षेत्राकडे तरुण पिढी आकर्षित होईल. मानले आभारकृषी क्षेत्र हे समाधान देणारे आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे या व्यवसायात जिद्द आणि चिकाटी ठेवून मेहनत घेतली तर नक्कीच यश मिळते असे यावेळी पुरस्कारप्राप्त शेतकरी उत्तम परब यांनी सांगत आपल्या या सत्काराबाबत कृषी विभागाचे आभार मानले.
गोडाऊनला टाळे;अवजारे अडकली
By admin | Published: June 18, 2015 11:59 PM