कणकवली : कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीज भारनियमना विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी विजवितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर आज, बुधवारी धडक दिली.कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना वीज भरनियमनाबाबत जाब विचारला. परीक्षा सुरू असताना वीज भारनियमन कराल तर विजवितरणच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या देऊ. वेळप्रसंगी विजवितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना घेराव घालत त्यांच्याशी विविध विषयांबाबत चर्चा केली.राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून वीज भारनियमन सुरू झाले आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्य वीज भारनियमन मुक्त होते. जिल्ह्यात आणि तालुक्यात सध्या शालेय परीक्षा सुरू आहेत. परीक्षा कालावधीत वीज भारनियमन करून शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असेही भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.कमी विज दाबामुळे चिरेखाण व्यावसायिकांच्या मोटर जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत रिले बदलला नाही तर जळालेलया सर्व मोटर आणून तुमच्या केबिनमध्ये टाकू असे उप-तालुकाध्यक्ष सोनू सावंत यांनी ठणकावले. ब्रेकर खराब असल्यामुळे कमी वीज भाराची अडचण निर्माण होत असल्याचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते म्हणाले. यावेळी दिवसेंदिवस वीज देयकांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यापुढेही अशीच स्थिती राहिल्यास भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आला.यावेळी भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, तालुका सरचिटणीस माजी उपसभापती महेश गुरव, पिसेकामते सरपंच सुहास राणे,बबलू सावंत, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, समीर प्रभूगावकर, हनुमंत बोन्द्रे, प्रसाद देसाई, सुशील सावंत, पप्पू पुजारे, विजय कदम, सदा चव्हाण, हरेश पाटील आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
वीज भारनियमन केल्यास कार्यालयाला टाळे ठोकू!, भाजपाचा विजवितरण कार्यकारी अभियंत्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 3:49 PM