दोडामार्ग : शहरातील लॉजवर रविवारी दोडामार्ग पोलिसांनी छापा टाकून गोव्यातून आलेल्या १५ प्रेमी युगुलांना ताब्यात घेतले. मात्र, ते सज्ञान असल्यामुळे त्यांची चौकशी करून सोडून देण्यात आले. पोलिसांच्या या संदिग्ध कारवाईमुळे संतापलेल्या शहरवासीयांनी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी त्यांनी चौकशी करूनच त्यांना सोडून दिल्याचे सांगितले. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पे्रमी युगुलांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असले, तरी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन याबाबतची कल्पना न देता त्यांना सोडून देण्यात आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला गोवा राज्याला लागूनच दोडामार्ग शहर आहे. गेल्या काही वर्षांत या शहरात पर्यटन वाढत असल्याने येथील विकास होत आहे. याठिकाणी पर्यटक व प्रवाशांच्या सोयीसाठी छोटे मोठे लॉज निर्माण झाले आहेत. पण गेल्या काही दिवसांत गोव्यातील प्रेमी युगुलांकडून या लॉजचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत होता. एवढेच नव्हे, तर गोव्यातील काही वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दलालांनाही दोडामार्गमध्ये आश्रय घेऊन येथूनच सेक्स रॅकेट चालविली जातात, अशीही चर्चा होत होती. मात्र, आतापर्यंत पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी दोडामार्गचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांनी शहरातील दोन लॉजवर (विश्रांतीगृह) छापा टाकून दोेन्ही ठिकाणाहून पंधरा प्रेमी युगुलांना ताब्यात घेत चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. या कारवाईबाबत पोलिसांकडून पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. दुपारी १ वाजता छापा टाकला असताना सायंकाळी ६ वाजले तरी माहिती देण्यात आली नव्हती. अजून उशीर लागेल, कारवाई सुरू आहे, हेच एकमेव कारण पोलिस ठाण्यातून सांगण्यात येत होते. त्यामुळे नेमकी काय कारवाई झाली, हे उशिरापर्यंत समजले नव्हते.
दोडामार्गात लॉजवर छापे; १५ युगुले ताब्यात
By admin | Published: October 02, 2016 11:33 PM