कणकवली: राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांचे कमी पगार व इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ७० किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा (लॉंग मार्च) २३ नोव्हेंबर रोजी आजरा येथून निघणार आहे. ही पदयात्रा २४ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार फेडरेशनचे अध्यक्ष प्राचार्य कॉ. ए. बी.पाटील व सिटूच्या सचिव मंडळ सदस्य कॉ. विजयाराणी पाटील यांनी संयुक्तपणे दिली आहे.प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सिटू संलग्न महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार फेडरेशनच्या बैठकीत मदतनीस आणि स्वयंपाकी यांच्या पगारामध्ये वाढ करावी, इंधनभार आणि भाजीपाला खर्चात वाढ करावी, आहारामध्ये अंडी वाटपच्या समावेशाबाबत फेरविचार करावा, आदी विषयांवर चर्चा झाली. बैठकीत गेली अनेक वर्षे वरील प्रश्न प्रलंबित असून महाराष्ट्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कामगार संघटनेच्या पुढाकाराने आजरा ते सांवतवाडी लॉग मार्च काढावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. दुसऱ्या दिवशी सिटू संलग्न महाराष्ट्र शालेय पोषण आहार राज्य फेडरेशनची झूम वरून ऑनलाईन बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शालेय पोषण आहार योजना कामगारांना महाराष्ट्रात दरमहा फक्त अडीच हजार रुपये पगार मिळत आहेत. तामिळनाडू राज्यात शालेय पोषण आहार कामगारांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा दिला आहे. तर केरळ आणि इतर सर्व राज्यांत किमान सात हजार ते चौदा हजार रुपये पगार आहे. महाराष्ट्रात कामही सक्तीने करून घेतले जाते, पण पगार केवळ अडीच हजार रुपये दिला जातो. मंत्री दिपक केसरकर यांच्या समोर याबाबत असंतोष व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि.२३) आजरा येथून लॉग मार्च निघून शुक्रवारी (दि.२४) सावंतवाडी येथे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयावर धडकणार आहे.
शालेय पोषण आहार कामगारांचा गुरुवारी आजरा ते सावंतवाडी लॉग मार्च, शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक देणार
By सुधीर राणे | Published: November 21, 2023 2:20 PM