आंबोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत सुटी असल्याने कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबई, पुणे आदी भागातून व्यक्तींचे गावी येणे वाढले आहे. तर परजिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींवर शनिवारपासून आंबोली आरोग्य केंद्राकडून होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
होम क्वारंटाईन लावलेल्या व्यक्तींनी ३१ मार्चपर्यंत घरातून बाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. महेश जाधव यांनी दिली.आंबोली, चौकुळ व गेळे परिसरातील व्यक्ती पुणे व मुंबई येथून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ साधा ताप व सर्दीलाही तपासणीसाठी आरोग्य केंद्रात धाव घेत आहेत. मात्र, आंबोली आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी आहेत. तर आंबोली आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावे असून अद्याप प्रत्येक ठिकाणी आरोग्य कर्मचारी जनजागृती तसेच सर्व्हेला पोहोचलेले नाहीत.
आंबोलीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी येथील आरोग्य केंद्रात अनुभवी एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाहीत. तपासणीसाठी लॅबही नसल्याने अनेक गैरसोयी भविष्यात होऊ शकतात. त्यामुळे आंबोली परिसराचे महत्त्व ओळखून येथे कोरोना साथ असेपर्यंत अनुभवी व जबाबदार एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.मुंबई, पुणे व आदी परिसरातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर स्टॅम्प दिसल्यास तत्काळ आंबोली ग्रामपंचायत किंवा आरोग्य केंद्रात माहिती द्यावी. तसेच गावातील व्यक्तींशी थेट संपर्क टाळावा, असे आवाहन डॉ.महेश जाधव व आंबोली टुरिझमकडून करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी सहकार्य करावे : महेश जाधवकोरोना संक्रमित भागातून आलेल्या व्यक्तींची नोंद आंबोली आरोग्य केंद्रात केली आहे. तर अद्याप नोंद करण्याचे काम चालू असून बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तींवर होम क्वारंटाईन स्टॅम्प लावून योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. तसेच बाहेरून आलेल्या व्यक्तींनी व गावातील ग्रामस्थांनी कोरोनाबद्दल शासनाकडून देण्यात आलेली माहितीद्वारे स्वत:ची काळजी घ्यावी.
काही शंका वाटल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. साथ या परिसरात पसरू नये यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरोग्य सेवा देण्यासाठी तयार आहोत, असे आवाहन डॉ.महेश जाधव यांनी केले आहे.