कणकवली : राष्ट्रीय फलोत्पादन योजनेवर आतापर्यंत ९० लाखांपेक्षा जास्त खर्च होत नव्हता. आता ६ कोटीपर्यंत खर्च होत आहे. शेतीकडे व्यापारी दृष्टीकोनातून पहा. खपेल ते पिकवा. मग शेती आईसारखे पालनपोषण करेल. शेतीला कुक्कुटपालनासारख्या दुय्यम व्यवसायाची जोड द्या. आंबा पिकाचे मूल्यसंवर्धन केल्यास जास्त फायदा होईल, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र वाकडे यांनी केले. सोमवारी सायंकाळी एकता प्रतिष्ठानतर्फे आयोजित आंबा महोत्सवाचा वाकडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. एकता प्रतिष्ठानच्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र वाकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार समीर घारे, नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू, एकता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी दाभोळकर, सचिव विशाखा परब, अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. हर्षद गावडे, डॉ. विद्याधर तायशेटे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील जमिन विविध घटकांनी परिपूर्ण असल्याने उत्कृष्ट आहे. व्यापार, नोकरीपेक्षा शेतीला भविष्यात सिंधुदुर्गात चांगले दिवस येणार असून त्यादृष्टीने युवकांनी प्रयत्न करावेत, असे वाकडे पुढे म्हणाले. प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी आंबा पिकाला जगभरात मागणी आहे. उत्पादकांनी त्याचा दर्जा लक्षात घ्यावा. काही तालुक्यांनी उत्पादनाची तर महामार्गालगत मार्केटिंगची जबाबदारी घ्यावी. तहसीलदार समीर घारे म्हणाले की, मार्केटिंगमुळे कुठल्याही उत्पादनाचे महत्त्व वाढते. आंबा महोत्सव जिल्ह्याबाहेर नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाण व्हावेत. जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्र विनावापर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जमिन लागवडीखाली आणावी. प्रक्रिया उद्योग विकसीत होण्यास अद्याप खूप वाव आहे. काही देशांत नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, नैसर्गिक समृद्धी असलेल्या सिंधुदुर्गात रानटी फळे आणि भाज्यांपासूनही फायदा मिळवला जाऊ शकतो, हे आपले सुदैव आहे. युवकांनी याचा विचार करावा, असे नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत म्हणाल्या. अॅड. उमेश सावंत यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. अॅड. राजेंद्र रावराणे, डॉ. विद्याधर तायशेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
शेतीकडे व्यापारीदृष्टीने पहा
By admin | Published: April 29, 2015 11:10 PM