मालवण : सर्जेकोट बंदरासमोरील कवडा रॉक समुद्रात रविवारी मध्यरात्री परराज्यातील तीन हायस्पीड नौकांना काही अज्ञात मच्छिमारांनी समुद्रात घेरल्याचा प्रकार समोर आला आहे. मच्छिमारांच्या जलधीक्षेत्रात या नौका घुसखोरी करत असल्याची माहिती समोर येत असून त्या मच्छिमारांनी मासळीची लुट करत आमच्या मासेमारी क्षेत्रात यापुढे येवू नये, अशी तंबी मच्छिमारांनी दिल्याचे समजते. मालवण किनारपट्टीवर या लुटमारीच्या धक्कादायक प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.मालवणसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर परराज्यातील नौका व एलईडी लाईट पर्ससीन मासेमारीने धुमाकूळ घातला आहे. यामुळे छोट्या पारंपारिक व नौका गिलनेट धारक मच्छिमारांच्या जाळीत मासळीच सापडत नसल्याने मच्छिमार हवालदिल झाला आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य विभागही या अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे मच्छिमारांचा संताप अधिकच वाढला आहे.एलईडी विरोधात मच्छिमारांनी किनारपट्टीवर बैठका घेत या अनधिकृत मासेमारीवर आळा घालण्यासाठी स्वत:हूनच समुद्रात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण किनारपट्टीवर आठ दिवसांपूर्वी झालेल्या मच्छीमारांच्या सर्वपक्षीय बैठकीत समुद्रातच अनधिकृत बोटी पेटवून देण्याची भूमिका मच्छिमारांनी घेतली होती.हायस्पीड नौकांवर हल्लाबोलसर्जेकोट-कवडा रॉक समुद्रात रविवारी रात्री काही अज्ञातांनी घुसखोरी केलेल्या हायस्पीड नौकांवर हल्लाबोल चढवला. यात हायस्पीड नौकेवरील मासळीची नासधूस करण्यात आली. हायस्पीड व एलईडी लाईट विरोधात आंदोलन करणा-या मच्छिमारांनी आपल्याला या घटनेबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. समुद्रात अशा पद्धतीने परराज्यातील नौकांची लुटमार करणारे मच्छिमार कोण आहेत ? अशा पद्धतीची लुटमार केव्हापासून सुरु आहे? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
मालवण किनारपट्टीवर मासळी लुटली, परराज्यातील नौकांना मासेमारी न करण्याची तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 8:29 PM