रत्नागिरी : शहरातील शेरनाका परिसरातील बंद असलेला फ्लॅट फोडून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत भरदिवसा चोरी करण्याची ही तिसरी घटना असून, या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.दीड महिन्यांपूर्वी शहरातील आठ दुकाने चोरट्यांनी फोडली होती. आता पुन्हा चोरट्यांची टोळी शहरात सक्रिय झाली असून, गेल्या दोन दिवसांत तीन घरफोड्या केल्या असल्याचे समोर आले आहे. प्रथम शहरातील पॉवरहाऊस, त्यानंंतर परटवणे व आता शेरेनाका परिसरात घरफोडीचा प्रकार घडला आहे.अमलेश गोविंद तांबे (४८, गंगा निवास अपार्टमेंट, रत्नागिरी) हे २४ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त गोवा येथे गेले होते. त्यामुळे गेले दोन दिवस घर बंद होते. तीच वेळ साधत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तत्काळ अमलेश यांना फोन लावून घडलेला सारा प्रकार सांगितला. त्यांनी रत्नागिरीमध्ये येऊन घराची पाहणी केली असता कपाटातील दागिने लंपास झाले असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
रत्नागिरीत फ्लॅट फोडून लाखोंचे दागिने लंपास
By admin | Published: February 26, 2017 11:55 PM