बांदा : रोणापाल मळी भागातील तीन एकरातील काजू बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन काजू हंगामात काजूबाग जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. सुमारे तीन एकरातील ६० ते ७० हून अधिक काजूची झाडे जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
गेली सात वर्षे मेहनत करून पीक घेण्यायोग्य झालेल्या काजूच्या झाडांना वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे आग लागल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. बागेतून जाणाऱ्या वीजवाहिन्यांचा यापूर्वी कधीच सर्व्हे न केल्यामुळे दुपारच्या सुमारास आलेल्या वाºयामुळे स्पार्किंग झाले. त्यामुळे आग लागून कलमे व काजूची झाडे यांच्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च आगीत जळून खाक झाल्याचे शेतकरी प्रकाश गावडे यांनी सांगितले.
मळी क्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची ही तिसरी वेळ असून शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच भविष्यातील सतर्कतेबाबत वीज वितरणकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. याला वीज वितरणच जबाबदार असल्याचे रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितले.
सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांना माहिती देताच त्यांनी तातडीने अग्निशमन बंब पाठवून दिल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यापूर्वी आग आटोक्यात आणण्यासाठी सुरेश गावडे, माजी सरपंच प्रकाश गावडे, दशरथ गावडे, सुदीन गावडे, बाबू कोळापटे, विठ्ठल कोळापटे, बाळू तोरसकर, तुषार देऊलकर, नंदू नेमण यांच्यासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.
नुकसान भरपाई द्यावीबांदा वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अनिल यादव, वायरमन नारायण मयेकर, कर्मचारी उमेश कोरगावकर तसेच बांदा पोलीस विजय जाधव व होमगार्ड विश्वजित भोगटे, पोलीस पाटील निर्जरा परब यांनीही घटनास्थळी भेट दिली. कृषी व महसूल विभागाचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त झालेला नाही. महावितरण विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अभियंता अनिल यादव यांनी नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.