कडावल : कडावल परिसरात पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्यामुळे पुढील काळातही नुकसानीची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वन्य प्राण्यांकडून शेती आधीच उद्ध्वस्त होत आहे. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.कडावल परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडल्यामुळे परिसरातील ओढे- नाल्यांना मोठा पूर आला. परतीच्या या पावसाचा भातशेतीवर मात्र प्रतिकूल परिणाम झाला असून कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे झाल्याने उत्पादनात घट येण्याचा धोका निर्माण झाला आहे.पीक शेतात आडवे झाल्यामुळे दाणे गळ होऊन पुढील काळात नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी खरीप हंगामात भातशेतीला अतिवृष्टीचा वारंवार सामना करावा लागला आहे. पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने पिकाची वाढ खुंटली.
तसेच काही भागात करपासदृश रोगाची लागण झाल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर गवे, सांबर व माकडांसारख्या वन्य प्राण्यांकडूनही शेती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. आता भातकापणीचा हंगाम सुरू होत असतानाच पुन्हा पावसाचे संकट समोर उभे ठाकल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत.