रत्नागिरी : मुंबई विद्यापीठात नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवीत कऱ्हाडमधील एका व्यक्तीने रत्नागिरीतील पाचजणांना दहा लाख ७५ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी माजी नगरसेविका नाझनीन युसुफ हकीम यांनी कऱ्हाडमधील डॉ. मुन्नवर बाशा शेख (रा. टेंबेवाडी रोड, मोरया आर्केड, कऱ्हाड, जि. सातारा) याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. २२ नोव्हेंबर २०१२ ते आतापर्यंतच्या काळात हा गुन्हा घडला आहे. नाझनीन हकीम या कऱ्हाड येथील एका इन्स्टिट्यूटमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होत्या. त्यांची त्या इन्स्टिट्यूटमध्येच काम करणाऱ्या डॉ. शेख याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने मुंबई विद्यापीठात लिपिकपदाची नोकरी लावतो, असे सांगितले. ही नोकरी हकीम यांनी नाकारली व आपल्या वहिनीसाठी नोकरीकरिता पैसे भरण्याची तयारी दाखविली.त्यानंतर डॉ. शेख याने आणखी काहींना पैसे भरून नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखविले. त्यामुळे आपल्या वहिनीसाठी एक लाख ७५ हजार, अन्य तिघांसाठी प्रत्येकी दोन लाख व उर्वरित रक्कम भावाच्या मुलासाठी असे डॉ. शेख याला रत्नागिरीतील युनियन बॅँक शाखा व बॅँक आॅफ महाराष्ट्र शाखेतील खात्यामार्फत पैसे पाठविले. मात्र, एप्रिल २०१४ नंतर डॉ. शेख याने कऱ्हाडमधून नोकरी सोडली. त्यानंतर त्याचा संपर्क होत नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची फिर्याद हकीम यांनी शहर पोलीसात दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)अन्य लोकांचीही फसवणूक?डॉ. शेख याने आणखीही काही जणांची नोकरी लावतो असे सांगून पैसे घेत फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाझनीन हकीम यांनी कऱ्हाडमध्ये संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये काही सहकाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईतूनही त्यांनी शेट्टी नामक व्यक्तीचा ‘त्याचीही फसवणूक झाल्याचा’ फोन आला होता, अशी माहिती हकीम यांना दिली.
रत्नागिरीच्या पाचजणांना लाखोंचा गंडा
By admin | Published: March 04, 2015 11:30 PM