दापोली - शिवाजी गोरे -लोटे औद्योगिक वसाहतीमुळे किती बेरोजगारांना रोजगार मिळाला, यापेक्षा दाभोळ खाडीत सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे ४० हजार मच्छीमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली, ही वस्तूस्थिती आहे. या खाडीत वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या मासेमारी व्यवसायावर गंडांतर आले. लोटे औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिकांना फायदा किती झाला, याहीपेक्षा दाभोळ खाडीतील अनेक मच्छीमार कुटुंबांवर विस्थापित होण्याची वेळ आल्याने लोटे औद्योगिक वसाहत दाभोळ खाडीच्या मुळावर उठली आहे, असे म्हणण्याची वेळ स्थानिक मच्छिमारांवर आली आहे.चिपळूण, गुहागर आणि दापोली या तीन तालुक्यांतून जाणाऱ्या दाभोळ खाडीत कित्येक पिढ्या भोई, खारवी, काळी, दालदी समाज मासेमारी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. या खाडी किनारपट्टीच्या तिन्ही तालुक्यातील सुमारे ६५ गावात मोठ्या प्रमाणावर हा मच्छीमार समाज वसलेला आहे. खाडीतील मासेमारी हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. परंतु माळरानावर लोटे येथे औद्योगिक वसाहत झाली. तेव्हापासून येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊ लागली.लोटे औद्योगिक वसाहतीचे रसायनयुक्त दूषित पाणी थेट दाभोळ खाडीत सोडण्यात येत असल्याने लाखो मासे दरवर्षी मरायला लागले. दरवर्षी पावसाच्या पाण्याबरोबर लोटे औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रीत पाणी सोडण्यात येत असल्याने प्रजनन काळातच मासे मरु लागल्याने दाभोळ खाडीतील मस्त्य उत्पादन घटले आहे. खाडीत आता मासेमारी करताना काही मोजक्याच जातीचे मासे आढळून येऊ लागले आहेत. काही जाती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दाभोळ खाडीत कधी काळी मासेमारीतून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे विस्थापित झाली असून मुंबई - पुणेसारख्या ठिकाणी अनेक कुटुंबे वेठबिगारीचे काम करीत आहेत. काही कुटुंबे अजूनही गावाकडेच आहेत. परंतु खाडीतील मासेमारी व्यवसायच संकटात सापडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबाकडे शेती नाही. तसेच पुरेसे शिक्षणसुद्धा नसल्याने या खाडीतील मच्छिमार समाज मागासलेला आहे. या समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी दाभोळ खाडीत गतवैभव प्राप्त करुन देण्याची गरज आहे. लोटे औद्योगिक वसाहतीचे रसायनमिश्रीत पाणी दाभोळ खाडीत सोडणे बंद झाले तरच हा मच्छीमार तरेल.सन २०१४ला दाभोळ खाडीत रसायनमिश्रीत पाणी सोडल्यामुळे गेल्या वर्षी याच दिवसात दाभोळ ते कोळथरे दरम्यान मृत माशांचा खच पडला होता. २०१३ साली बुरोंडी ते लाडघर - मुरुड कर्दे या समुद्र किनाऱ्यावर मृत माशांचा खच पडला होता. २०१२ साली मुरुड हर्णै या समुद्र किनाऱ्यावर खाडीतील काही टन मृत माशांचा खच पडला होता. २० वर्षांपासून अशा प्रकारे मासे दरवर्षी मृत पावत आहेत. या समुद्र किनाऱ्यावर मृत्यू पावलेल्या माशांचे व पाण्याचे रिपोर्ट दरवर्षी टेस्टिंग करीत प्रदूषण मंडळाचे अधिकारी पुणे येथे लॅबकडे पाठवित आहेत. परंतु एकदाही या रिपोर्टच्या अहवालात हे मासे कशामुळे मेले याचा अहवाल जनतेसमोर आलेला नाही. हे मासे नैसर्गिक पद्धतीने मेले असल्याचा अहवाल आला आहे. जर का केमिकलमुळे मासे मरत असतील तर दोषी कंपन्यांवर कार्यवाही का झाली नाही. या अहवालाचे गौडबंगाल काय आहे, हे समोर यायला हवे, अशी अपेक्षा केली जात आहे.लोटे औद्योगिक वसाहतीमुळे दाभोळ खाडीतील मत्स्य उत्पादन घटले असून, दरवर्षी रसायनमिश्रीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे खाडीतील शेकडो प्रकारच्या जाती नामशेष झाल्या आहेत. तसेच काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वेळीच दाभोळ खाडी वाचविण्याची गरज आहे.लोटे औद्योगिक वसाहतीमुळे दाभोळ खाडीतील मासे मरत असतील, तर दोषी कंपनीवर कार्यवाही व्हायला हवी. स्थानिक मच्छिमार उद्ध्वस्त होत असेल तर रासायनिक कंपनीला आमचा विरोध राहील.- आ. संजय कदमपावसाच्या पाण्याचा फायदा उठवत दरवर्षी दाभोळ खाडीत रसायनमिश्रीत पाणी सोडण्यात येते. यामुळे लाखो टन मासे मृत होत आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मासे मरुन या खाडीतील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. तरीही सरकार व राजकीय पुढारी गप्प का? मच्छिमार बांधवांची उपासमार कधी थांबणार, असा संतप्त सवाल मच्छिमार व व्यावसायिक अस्लम अकबाणी यांनी केला आहे.
लोटे औद्योगिक वसाहत दाभोळ खाडीच्या मुळावर
By admin | Published: June 29, 2015 11:02 PM