खेड : पेण-मालदेव शेडाशीवाडी येथील लीलाबाई सावंत आणि त्यांच्या दोन मुलींचा बळी पे्रमप्रकरणातून गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुलीसह तिच्या आईनेही आरोपीला या विवाहासाठी नकार दिल्याने या साऱ्यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरेश धोंडू ढवळे व चंद्रकांत ढवळे (शिरगाव, पिंपळवाडी) अशी या दोघांची नावे आहेत. खेड तालुक्यातील शिरगाव येथील अशोक ढवळे याचे मनिषा सावंत हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. मात्र तिने लग्नासाठी नकार दिल्याने सुडबुद्धीने मायलेकींचे बळी घेतल्याचे उघड झाले आहे़ या प्रकरणामध्ये लीलाबाई हिच्या मोठ्या मुलीने केलेल्या सहकार्यामुळेच या घटनेचा तपास करणे शक्य झाल्याचे खुद्द पोलिसांनीच सांगितले आहे.शिरगाव पिंपळवाडी येथील आरोपी अशोक ढवळे हा कामानिमित्त पेण येथे गेला होता. यावेळी मोलमजुरी करीत आपले पोट भरणाऱ्या लीलाबाईशी अशोकची ओळख झाली. तिची मोठी मुलगी दीपाली हिचे लग्न झाल्याने ती सासरी राहत आहे. ओळख झालेल्या अशोक ढवळे यांनी तिची मुलगी मनीषा हिच्याशी लगट करायला सुरूवात केली होती. मात्र, मनिषा त्याला तसा कोणताच प्रतिसाद देत नव्हती. त्याने तिच्या आईकडेही मनीषासाठी लग्नाची मागणी घातली होती़ मात्र, मनीषा आणि आईनेही त्याला नकार दिला़ याचा राग ढवळे याला आला होता. लीलाबाईशी गोड बोलून त्याने तिला रघुवीर घाटात आणले आणि १२ फेब्रुवारीला तिची निर्घृण हत्या केली. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबईल काढून घेतले. यावेळी ढवळे याने आई आजारी असल्याने तातडीने येण्याची विनंती मुली पुनम आणि मनीषा यांना मोबाईलवरून केली़ त्या दोघीही आल्या. दोघी आल्यानंतर मनीषाला लग्नाबाबत विचारले. त्यावेळी तिने प्रथम आई कुठे आहे ते सांग, असे सांगितले. याचवेळी रागावलेल्या अशोकने शिंदी (महाबळेश्वर) येथे राहणारा अविनाश भोसले आणि बाबा शिंदे यांच्या मदतीने या दोघींवर अत्याचार करून त्यांचा खून केला आणि मृतदेह जंगलातील माकडकडा भागात टाकून दिले. (प्रतिनिधी)दीपालीचाही काटा काढायचा होता पण...या खुनानंतर लीलाबाईची मोठी मुलगी दीपाली हिचादेखील काटा काढण्यासाठी आरोपीने तिला मोबाईलवरून बोलावले होते़ परंतु, ती गेलीच नाही़ आपली आई आणि दोन बहिणी १ महिन्यापासून बेपत्ता असल्याने तिने लागलीच पोलिसांशी संपर्क साधला होता. यावेळी तिने दिलेला तिच्या आईचा मोबाईल नंबर आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण ठरला. सध्या तिन्ही आरोपी तुरूंगात आहेत.
प्रेमासाठी कुटुंब संपवण्याचा डाव
By admin | Published: April 29, 2015 10:17 PM