सावंतवाडी : काँग्रेसशी बंडखोरी करून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित असलेले दिलीप नार्वेकर हे पक्षाचे आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गणले जात होते. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मात्र, उमेदवारी मागे न घेतल्यास त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई केल्यास पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी दिला. दरम्यान, आगामी काळात जिल्हा परिषदसह सावंतवाडी पंचायत समिती सभापती व वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापतीपद ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी संबंधित सदस्यांना व्हीप बजावण्यात येणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावंत म्हणाले, नार्वेकर यांनी आपण प्रदेशाध्यक्षांचे पत्र आणले, असे सांगितले. मात्र, ते पत्र बोगस आहे. थोरातांची सही स्कॅन करून ते लिहिले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल. ती सही आपली नाही याबाबत खुद्द थोरात स्पष्टीकरण देणार आहेत. त्यामुळे निष्ठावंत असलेल्या नार्वेकरांनी माघार घ्यावी.
अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करू. त्यांच्यावर ज्या कारवाया होतील त्या मागे घेण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यासह त्यांच्यासोबत फिरणाऱ्या अन्य कार्यकर्त्यांवरही कारवाईचा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.सावंत पुढे म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जात आहे.राज्यात अशा प्रकारचे धोरण ठरलेले आहे. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक, सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक व वेंगुर्ला पंचायत समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून संबंधित सदस्यांना व्हीप बजावण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे.