देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्यात लंपी राेगाने थैमान घातले असून ५५ गुरे या रोगाने ग्रस्त आहेत. यामध्ये मुणगे गावातील एका बैलाचा मृत्यु झाला आहे.देवगड तालुक्यात गेल्या आठ दिवसात लंपी राेगाने अक्षरश: थेमान घातले असून गुरे लुळी पडून जाग्यावर असल्याने शेतकरीवर्गात सध्या भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात ५५ गुरांना लम्पी राेगाची लागण झाली. यामध्ये खुडी ६, मुणगे ९, पाेयरे ५, दहिबांव २, कुणकेश्वर ६, इळये ५, दाभाेळे ८, टेंबवली कालवी ४, माेंड ४ आणि बापर्डे ४ एवढ्या गुरांना या राेगाची लागण झाली आहे. अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डाॅ.माधव घाेगरे यांनी दिली. लागण झालेल्या सर्व गुरांवर उपचार सुरू असून यामधील बहुतांशी गुरांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.लागण झाल्यानंतर तात्काळ पशुवैद्यकीय विभागामार्फत गुरांवर उपचार सुरू करून लसीकरण करण्यात आले आहेत. स्थानिक दवाखान्यात पुरेसा लससाठा, औषधसाठा उपलब्ध असून शेतक-यांनी गुरांना या राेगाची लागण झाल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा असे आवाहन डाॅ.घाेगरे यांनी केले आहे
Sindhudurg: देवगड तालुक्यात लम्पीचे थैमान, ५५ गुरांना लागण, मुणगेत एका बैलाचा मृत्यू
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 10, 2023 12:52 PM