लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली (सिंधुदुर्ग): मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बसला (क्रमांक एम.एच.१२ के.क्यू.५७६९) आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लक्झरी मधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले .
या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्य केले. कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला तत्काळ पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थानीही मदतकार्य केले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी ती वाहतूक सुरळीत केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"