कणकवली(सिंधुदुर्ग): कणकवली शहरालगत असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावर गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस पलटी झाली. त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सहा गंभीर जखमी झाले आहेत. तर उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या लक्झरी बसमधून सुमारे ४० प्रवासी प्रवास करीत होते. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने एकच हलकल्लोळ झाला. मृत प्रवाशांची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
हळवल फाट्यावरील अवघड वळणावर ही लक्झरी बस पलटी झाली. या अपघाताची माहिती मिळतात कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ. अभिजीत आपटे, पोलीस कर्मचारी किरण मेथे यांच्यासह अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील काहींना कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात तर उर्वरित जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींचे हात, पाय फ्रँक्चर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे धोकादायक वळण वारंवार अपघातास निमंत्रण देत असून महामार्ग चौपदरीकरण कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कामामुळे या अपघातग्रस्त वळणावर सातत्याने गेले काही वर्षे अपघात सुरू आहेत.
एवढे अपघात होऊन देखील ठेकेदार कंपनीचे डोळे केव्हा उघडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी नगरपंचायतचे गटनेते संजय कामतेकर यांच्याशी संपर्क साधत कलंडलेली लक्झरी उभी करण्याकरिता जेसीबी पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार ठेकेदार अनिल पवार, जावेद शेख हे जेसीबी घेऊन अपघातस्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने ही लक्झरी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.