मालवण: ‘रक्षण करण्या देशाचे आपण तोडीले पाश नात्यांचे...स्वीकाराव्या आमुच्या राख्या, प्रतीक बंधू प्रेमाचे...’ असा बंधुप्रेमाचा संदेश देत मालवणच्या भंडारी ए.सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सीमेवर देशाचे रक्षण करणार्या सैनिक बंधूंना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठविल्या. यामध्ये जम्मू काश्मीर, पंजाब, अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणी देश रक्षणाचे महान कार्य करणार्या मराठा बटालियनच्या 555 सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या. याप्रसंगी विद्यार्थिनींनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणा देत सैनिक बंधुंविषयीचे आपले प्रेम व्यक्त केले.
भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी रक्षाबंधनच्या निमित्ताने सैनिकांना राख्या पाठविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षीही हा उपक्रम राबवून मराठा बटालियनच्या राष्ट्रीय रायफल्सच्या 555 सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या. रक्ताचे नाते असलेला भाऊ फक्त बहिणीचे रक्षण करतो, मात्र आपण भारतमातेचे रक्षण करत आहात, देशसेवेचे पवित्र कार्य आपल्याकडून अविरत घडत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना असा शुभसंदेशही राख्यांसोबत विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी पाठविला आहे..
यासाठी मालवण पोस्ट कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे. कॉलेजच्या प्राचार्या सौ. समिता मुणगेकर यांच्या हस्ते सर्व राख्या व शुभ संदेशाचे लखोटे पोस्ट कार्यालयाच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. प्रा. पवन बांदेकर व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबविला. यावेळी पर्यवेक्षिका सौ.टिकम, प्रा. पवन बांदेकर, प्रा. एस. एन. पराडकर, प्रा. एस.बी. परब, प्रा. सातार्डेकर मॅडम, प्रा. चव्हाण मॅडम, प्रा. सामंत मॅडम यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या..