सिंधुदुर्ग ( वेंगुर्ला ) : २०१९ मध्ये भारतीय नागरिकत्व कायद्यात केलेल्या दुरुस्तीबाबत अत्यंत खोटे बोलून, अपप्रचार करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम गेले काही दिवस सातत्याने सुरु आहे. जनतेने या दुरुस्ती केलेल्या कायद्यातील सत्य समजून घ्यावे. कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. केवळ राजकारणासाठी जे समाजात संघर्ष भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडे जनतेने पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन भाजपाचे प्रमुख प्रवक्ते माधव भांडारी यांनी वेंगुर्ला येथे केले.
तर यावेळी भांडारी म्हणाले, ज्या मुद्यावर आम्ही मते मागितली त्या मुद्यावर काम करणे आमचे कर्तव्य आहे, आणि ते आम्ही करीत आहोत. या कायद्यात केलेली दुरुस्ती वास्तविक सर्वसमावेश आहे. या दुरुस्तीमुळे कोणाला नागरिकत्व सिद्ध करण्याचा तसेच कोणतीही कागदपत्रे मागण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही, असे ते म्हणाले.
सन १९५0 ते २00९ या काळामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतून त्या देशातील जे हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी हे निर्वासित म्हणून भारतामध्ये आलेले आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व देणे एवढ्या मर्यादित कारणासाठी ही दुरुस्ती केलेली आहे.
त्यामुळे या दुरुस्तीमुळे कोणाच्याही नागरिकत्व बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. जनतेने एवढे समजून घ्यावे की, यात केलेली दुरुस्ती ही या कायद्यातील पहिली दुरुस्ती नसून यापूर्वी ५ दुरुस्त्या अशाप्रकारे वेगवेगळ्या देशातील नागरिकांसाठी त्या त्या वेळच्या सरकारने केल्या आहेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने दुरुस्त्या कराव्या लागल्या तरी त्यावेळी जे कोणी सरकार असेल त्यांना ते करावे लागेल, असेही माधव भांडारी यांनी सांगितले.
नागरिकत्व दुरुस्त विधेयकाबाबत राजकीय पक्षांची काही नेतेमंडळी समाजात वेगवेगळ्या अफवा पसरवित आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत असल्याचे भांडारी यांनी स्पष्ट केले.