CAA: हिंसाचार माजवून राजकारण करणाऱ्यांच्या पाठीमागे विरोधकांचा हात: भंडारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:21 PM2020-02-11T12:21:34+5:302020-02-11T12:21:48+5:30
घटनात्मक चौकटीत राहून करण्यात आलेल्या कायद्याचे आव्हान देणाऱ्या काँग्रेसला संसदीय कार्यपद्धती, संविधान मान्य नाही, असेच यातून दिसून येत असल्याचे टीकास्त्रदेखील त्यांनी केले.
रत्नागिरी ( देवरुख ) : नागरिकत्व कायद्यावरून एवढा विरोध आणि संघर्ष का सुरू आहे. आपण संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. हा कायदा सरकारने बहुमताने घटनात्मक कार्यपद्धतीच्या चौकटीत राहूनच संमत केलेला आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीला संविधानाशी, घटनात्मक कार्यपद्धतीशी बांधीलकी नसल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्र मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी देवरुख येथे केला. 'नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ भ्रम आणि वास्तव' याविषयी व्याख्यान व चर्चासत्रात भंडारी बोलत होते.
यावेळी भंडारी म्हणाले की, सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून विरोधी भूमिका टोकाला पोहोचल्या आहेत. टोकाची विधाने दिल्लीच्या शाहीनबाग यांच्याकडून केली जात आहेत. कायद्याचे समर्थन करणाऱ्यांना देखील हा कायदा म्हणजे काय हे कळालेले नाही, तर विरोधी भूमिका संघर्ष करणाऱ्यांना देखील याची नीटशी माहिती नाही. तर कायद्याला विरोध करुन जे लोक हिंसाचार माजवून राजकारण करीत आहेत, त्याच्या पाठीमागे विरोधकांचा हात असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचे विधेयक डिसेंबरमध्ये मांडण्यात आले. या कायद्यामध्ये आजपर्यंत सातवेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. यातील सहावेळा दुरुस्त्या काँग्रेसच्या राजवटीत झाल्या आहेत. २००३ मध्ये झालेली दुरुस्ती आणि आता केलेली दुरुस्ती या दोनच दुरुस्त्या भाजपच्या सरकारने केल्या आहेत. घटनात्मक चौकटीत राहून करण्यात आलेल्या कायद्याचे आव्हान देणाऱ्या काँग्रेसला संसदीय कार्यपद्धती, संविधान मान्य नाही, असेच यातून दिसून येत असल्याचे टीकास्त्रदेखील त्यांनी केले.