लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : तेरेखोल नदीकाठी वसलेल्या मडुरा गावात दिवसेंदिवस मगरींची दहशत वाढतच आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सुकळवाड येथील शेतात आहे. या विहिरीच्या बाजूला मगरींचे वास्तव्य असलेली नदी वाहत असल्यामुळे गेले तीन दिवस गावातील पाच वाड्यांचा पाणीपुरवठा खंडित आहे. ग्रामपंचायत नळकामगार मगरींच्या धास्तीने पाणी सोडण्यासाठी एकटा जाण्यास घाबरत आहे. याकडे ग्रामपंचायत तसेच वनविभागाने लक्ष देऊन गावात मगरींची असलेली दहशत दूर करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.मडुरा-सुकळवाड येथे शनिवारी सकाळी एक सुमारे बाराफुटी मगर व तीन म्हशींमध्ये सुरू असलेले थरारनाट्य पाणी सोडण्यासाठी गेलेल्या नळकामगार बाबली परब यांनी अनुभवले. अचानक गुरांची झालेली धावपळ पाहून त्यांना जवळपास मगर असल्याचा संशय आला. ‘त्या’ मगरीच्या हल्ल्यात तीन म्हशी जखमी झाल्या होत्या. अशा जीवघेण्या परिसरात गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.देऊळवाडी, रेडकरवाडी, बाबरवाडी, चौकेकरवाडी, डिगवाडीमध्ये गेले तीन दिवस पाणीपुरवठा खंडित होता. त्यामुळे गावातील महिलांची मोठी पंचाईत झाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यासोबतच गावात सुरू असलेले मगरींचे हल्ले पाहून ग्रामस्थ तसेच महिलांनी कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्रा न घेता नळकामगारास सहकार्य केले. मात्र यावेळी वनविभागावर ताशेरे ओढण्यात आले.वनविभाग मगरींसंदर्भात कोणत्याही हालचाली करत नसून हल्ल्याबरोबरच आता आम्हांला पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळणे कठीण झाले असल्याचे काही महिलांनी बोलून दाखविले. याकडे वनविभाग व ग्रामपंचायत यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.दुसºयांसाठी आपला जीव धोक्यातआपला जीव धोक्यात घालून सुकळवाड येथील शेतात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवर पाणी सोडण्यासाठी जावे लागत आहे. प्रत्येक दिवशी एकतरी सोबती घेऊनच याठिकाणी येणे गरजेचे आहे. दबा धरून बसलेल्या मगरी कधी फस्त करतील याचे काही सांगता येत नाही. गेले तीन दिवस विजेच्या समस्या तसेच महत्त्वाचे म्हणजे मगरींच्या दहशतीमुळे पाणी सोडण्यास अडचण येत असल्याचे मडुरा ग्रामपंचायत नळकामगार बाबली परब यांनी सांगितले.
मडुरा गावाला मगरींची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:57 PM