कणकवली: लोकसभेची निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे. पुन्हा सत्तेत येण्यापासून भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीही काळाची गरज आहे. लोकसभा ते अगदी ग्रामपंचायत निवडणुकीतही ती कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करूया.कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया. असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले. कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत खासदार विनायक राऊत यांच्या 'लेखा जोखा' या कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,जान्हवी सावंत, नीलम सावंत,अतुल रावराणे,संग्राम प्रभुगावकर, भाई गोवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, रेवती राणे, अर्चना घारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,विकास सावंत, साक्षी वंजारे, नागेश मोरये,आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राऊत म्हणाले, संसदपटू बॅ. नाथ पै,मधू दंडवते, सुरेश प्रभू, सुधीर सावंत या माजी खासदारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत मी काम केले आहे. विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा जनतेच्या प्रश्नांवर संसदीय सर्व आयुधे वापरून आवाज उठविला आहे. लवासा सारखे आंबोली येथे २७ बंगले बांधले आहेत. तिथे दीपक केसरकर सिंधूरत्न योजनेमधून रस्त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करीत होते. त्याचा भांडा फोड आम्ही केला. प्रमोद जठार माझ्यावर टीका करीत आहेत. मात्र, रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली सामान्य जनतेला देशोधडीला लावून भूमाफियाना साथ देणाऱ्यांना मी विरोध केला. त्यामुळे मी खलनायक आहे. जनतेच्या हितासाठी मी यापुढेही लढत राहीन, मग मला कितीहीवेळा खलनायक म्हटले तरी चालेल. संसदेत मी आवाज उठवल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाली, हे लक्षात ठेवावे.आम्ही एकसंघ महाविकास आघाडीमध्ये कोणीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही एकसंघ आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचे चार मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना इथे आणावे लागते, हे दुर्दैव आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षात ठेवावे की, त्यांचे राज्य आमच्या लोकांवर आवलंबून आहे.त्यामुळे आधी गोवा उभारा आणि मग सिंधुदुर्गात या. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत बेसावध आणि बेफिकीर राहू नये,प्रत्येक घराघरात जावून आपला विचार पोहचवावा.भाजप नेते तसेच राणे कुटुंबीय माझ्यावर टीका करतात. मात्र, गेल्या १० वर्षात वडिलोपार्जित जमीनीपेक्षा माझी किती जमीन वाढली आहे. ते मला दाखवावे. तसेच वाढलेली जमीन असेल तर राणे कुटुंबीयांनी ती घ्यावी. मंत्रीपद भोगूनही उदय सामंत यांना जे शक्य झाले नाही ते आम्ही करून दाखवले असेही ते म्हणाले. यावेळी आमदार वैभव नाईक तसेच महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी काळाची गरज - विनायक राऊत
By सुधीर राणे | Published: March 05, 2024 6:06 PM