Sawantwadi Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. दीपक केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गाचे चांगले होणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
सावंतवाडीत भाजपातून ठाकरे गटात आलेल्या राजन तेली यांना उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकरांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दीपक केसरकरांसोबतच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री शिंदेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडझडीसाठी वाऱ्याला जबाबदार धरल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सागरी वाऱ्यामुळे पडला म्हणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"आपले इथले आमदार खाली मुंडी पाताळ धुंडी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ते म्हणतात की वाईट आतून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडला त्यातून चांगलं काय होणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे की कचरा. त्यातून काही चांगलं होणार नाही पण दीपक केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गाचे चांगले होणार आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
"ज्या काही गोष्टी मी आणू इच्छित होतो त्या अजूनही का झाल्या नाहीत याचे उत्तर द्या. मल्टी स्पेशल हॉस्पिटलसाठी मी परवानगी दिली होती पैसे देत होतो पण ते अजूनही झालेला आहे का? आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला चांगलं हॉस्पिटल देऊन दाखवेल. माझ्याकडे माहिती आहे की हेच महाशय आणि त्यांचे मित्र टीमलो, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवर फिरत होते जागा शोधण्यासाठी. ते जागाशोधत होते शाळा कॉलेज हॉस्पिटलसाठी, एखादा चांगला विनाश न करणारा प्रकल्प होण्यासाठी तर नाही. ते जागा अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी शोधत होते. सगळं काही ओरबाडून घ्यायचं आणि आता तुमच्या चरणी वाहून टाकायचं. सरकार आल्यानंतर अदानीच्या घशात घातलेली मुंबई मी काढून घेणार आणि आणि माझ्या जीवनी कामगारांना तिथे परवडणारे किमतीमध्ये घरं देणार आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.