Maharashtra Assembly Election 2024 : सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधातील भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यात त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री मळगाव रेल्वेस्टेशन परिसरात घडली. दरम्यान, हल्ल्यानंतर हल्लेखोराला स्थानिक लोकांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून उशिरापर्यंत हल्या मागचे कारण मात्र समजू शकले नाही.
मळगाव येथील नरकासुर स्पर्धा आटोपून विशाल परब हे घरी परतत असताना सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्या गाडीवर बांबूने हल्ला केला या अचानक घडलेल्या घटनेनंतर परब थोडे चक्रावून गेले पण लागलीच गाडी थांबवून हल्लेखोराला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. ड्रायव्हरने चपळाईने गाडी बाजूला घेतल्यानेच विशाल परब यांचा जीव वाचला तसेच हल्ल्याचा प्रयत्न फसला हल्लेखोराने घटनेनंतर जवळच्या जंगलात धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या स्थानिक युवकांनी पाठलाग करून हल्लेखोराला बाजूच्या झाडीतून ताब्यात घेतले.
संतप्त युवकांनी त्यांची चौकशी केली असता त्याने आपण झारखंडमधील असल्याचे आणि आपल्याला कोणीतरी हे काम सांगितल्याचे हिंदीतून बोलत कबूल केले.आपल्याला गाडीतून सोडून कोणीतरी इथे सोडत हल्ला करायला सांगितले असल्याचे त्याने स्थानिक युवकांजवळ कबूल केले. जमावाने याची कल्पना पोलिसांना दिली आहे.विशाल परब हे महायुतीत बंडखोर उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे हा घातपाताचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी याचा योग्य तपास करावा अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर विशाल परब यांनी दिली आहे.