सावंतवाडी - सध्या सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांच्या प्रचारादरम्यान सावंतवाडी तालुक्यातील सातुळी येथील प्रचार सभेत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. आपल्या माहेरच्या माणसांकडे मत मागण्यासाठी आलेल्या घारे-परब याच्या अश्रूंचा बांध फुटला. गेली आठ वर्षे जोरदार तयारी करून ही पक्षाने डावल्याचे सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले. मात्र ग्रामस्थांनीच पुढे येत त्याना धीर दिला तसेच आपल्या पाठीशी माहेरची लोक असल्याचे सांगत त्यांना शांत केले. त्यानंतर त्यानंतर आपले भाषण पूर्ण करून त्या पुढील दौऱ्यासाठी निघून गेल्या.
अर्चना घारे-परब या सावंतवाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. अर्चना घारे परब यांनी मागच्या आठ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली होती. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उध्दव सेनेला सुटला आणि घारे-परब यांचा पत्ता कट झाला. मात्र घारे-परब या मागे हटल्या नाही त्यांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचारात सक्रीय झाल्या असून गावोगावी त्या प्रचारा निमित्त फिरत आहेत.
याच दरम्यान मंगळवारी रात्री च्या सुमारास आपल्या माहेरच्या परिसरात प्रचारासाठी गेल्या होत्या. पण आपल्या माहेरच्या माणसाना बघून त्या भावूक झाल्या. मागील आठ वर्षे काम करून ही आपल्या लेकीला डावलण्यात आले पक्षाने तिकिट दिल नाही, पण तुम्ही घाबरू नका, आम्ही पाठीशी ठाम पणे उभे राहू असे म्हणत अर्चना घारे-परब यांना धीर दिला. त्यानंतर घारे-परब यांनी आपले उर्वरित भाषण आवरते घेत सर्वाचा निरोप घेऊन पुढील प्रचार सभेसाठी रवाना झाल्या. मात्र ग्रामस्थांनी ही आपल्या लेकी समोर विकासाच्या व्यथा मांडल्या तसेच लेकीने ही सोडविण्याचे आश्वासन दिले.