रत्नागिरी, सिंधुदुर्गात काँग्रेसची पाटी कोरीच; राजापुरात बंडाचे निशाण
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 30, 2024 07:06 PM2024-10-30T19:06:52+5:302024-10-30T19:07:54+5:30
महेश सरनाईक सिंधुदुर्ग : एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा कोकण म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची ओळख होती; मात्र ...
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा कोकण म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची ओळख होती; मात्र लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीतून रत्नागिरीतील पाच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन म्हणजे एकूण आठपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेसची पाटी कोरी राहिली आहे.
यामुळे कट्टर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून, पक्षाच्या या परिस्थितीला जबाबदार कोण ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. याच रागातून राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.
कोकणातील नेत्यांना आमदार, खासदार, महामंडळाचे अध्यक्ष, राज्यातील विविध मंत्रिपदे आदी पदे मिळाली आहेत.
खासदार नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना म्हणजे सन २००५ साली राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे त्यांच्याकडे होती. सन २००५ ते २०१४ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने काँग्रेसकडे होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा हात जगन्नाथ ठरला होता. आमदार नितेश राणे यांच्या रूपाने कणकवली विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये काँग्रेसचा कोकणातील एकमेव आमदार होता. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही राज्यात सर्वत्र काँग्रेसचा पराभव झाला असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसचा मोठा विजय झाला होता.
नेतृत्वाकडूनही दुर्लक्ष
नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत स्वत:चा स्वाभिमान पक्ष काढला आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसची पूर्णत: वाताहत झाली. राणेंसोबत जे काँग्रेसमध्ये गेले होते. ते पुन्हा राणेंच्या समवेत त्यांच्या पक्षात गेले आणि काही काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते होते ते देखील राणेंसमवेत गेले. या सर्व घटनांकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मात्र वेळोवेळी दुर्लक्ष केले.
राजापुरात काँग्रेसमधून बंडाचे निशाण
काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांना राजापूर मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा वाटत होती. मागील दोन वर्षांपासून ते त्यादृष्टीने प्रयत्नशील होते. महाविकास आघाडीत रत्नागिरीतील पाच मतदारसंघापैकी चार मतदारसंघ उद्धवसेना आणि एक मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला. त्यामुळे अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत राजापूरमधून बंडाचे निशाण रोवले आहे.
आघाडीचेच काम करणार
राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन व्हावे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्ह्यात एकही जागा काँग्रेसला मिळाली नसली तरी आम्ही नाराज न होता आघाडी धर्म पाळणार असून आघाडीच्या उमेदवारांसाठी मनापासून काम करणार आहोत. - प्रदीप मांजरेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष, कणकवली.