कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, भाजपकडून निवडणूक लढणारे व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र असलेले आमदार नितेश राणे तसेच उद्धवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेले कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्यातच खऱ्या अर्थाने ‘काँटे की टक्कर’ होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.महायुतीच्या जागा वाटपात भाजपकडे रत्नागिरी - सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदार संघाची एकमेव जागा आली आहे. या जागेसाठी आमदार नितेश राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर आधीपासूनच राणेंच्या विरोधात असलेल्या उद्धवसेनेने संदेश पारकर यांना महाविकास आघाडीच्यावतीने ऐनवेळी अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांमध्येच थेट लढत होणार आहे. या लढतीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, गणेश अरविंद माने व बहुजन समाज पक्षाचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे आणखीन चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत.ते किती मते घेण्यात यशस्वी होतात हे या मतदारसंघातील निकालाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.राणेंना मानणारे कार्यकर्ते आणि मतदार या मतदारसंघात आहेत. कार्यकर्त्यांचे नेटवर्कही नितेश राणे आणि भाजपकडे आहे.तर गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे ही राणेंची जमेची बाजू आहे. उद्धवसेनेने ऐनवेळी संदेश पारकर यांना रिंगणात उतरवल्याने प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याने ही लढत त्यांच्यासाठी तेवढी सोपी नाही. विजयासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. येथील विकासासाठी आपल्याला एकदा आमदारकीची संधी द्यावी अशी मतदारांना भावनिकदृष्ट्या साद संदेश पारकर घालत आहेत. त्याला यश येणार का? हा खरा प्रश्न आहे. तसेच या दोन्ही उमेदवारांच्या पक्षाचे मित्र पक्ष निवडणुकीत किती मदत करतात? महाविकास आघाडी व महायुतीचे वरिष्ठ नेते आगामी काळात जाहीर सभा घेणार असून ते जी आश्वासने देणार आहेत त्यामुळे मतदारांचे मतपरिवर्तन होणार का? हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे.या मतदार संघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे ८४,५०४ मतांसह विजयी झाले होते. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी या मतदार संघातून ९२,४१९ म्हणजे ७ हजार ९१५ अधिक मते मिळविली होती.त्याचप्रमाणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सतीश सावंत यांनी ५६,३८८ मते मिळविली होती. तर २०२४ लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार विनायक राऊत यांना ५०,४२४ मते मिळाली होती.म्हणजेच ५९६४ मते कमी मिळाली होती.काळानुरूप तसेच व्यक्तीपरत्वे राजकीय समीकरणे बदलत असली तरी आता या विधानसभा निवडणुकीत नितेश राणेंना मागील निवडणुकीप्रमाणे मताधिक्य टिकविणे शक्य होणार का ? तसेच संदेश पारकर यांना आपले मताधिक्य वाढविता येणार का ? यावर कोण विजयी होणार हे ठरणार असून २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकालादिवशीच ते स्पष्ट होणार आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघ २०१९ ची स्थिती!उमेदवाराचे नाव - पक्ष - मिळालेली मतेनितेश राणे - भाजपा - ८४,५०४ विजयी.सतीश सावंत - शिवसेना - ५६,३८८.सुशील राणे - काँग्रेस - ३,३५५.
-कणकवली विधानसभा मतदार संघात २०२४ लोकसभा स्थिती उमेदवाराचे नाव - पक्ष - मिळालेली मतेनारायण राणे - भाजप - ९२,४१९.विनायक राऊत - उद्धवसेना-५०,४२४.नारायण राणे यांना मताधिक्य ४१,१९५.
कणकवली विधानसभा मतदार संघमतदार - २ लाख ३१ हजार ७४०स्त्री - १लाख १७ हजार ३५९.पुरुष - १ लाख १४ हजार ३७९.तृतीयपंथी - २.