Maharashtra Budget 2024: कोकणसाठी छप्पर फाडके निधीची तरतूद, सिंधुदुर्गात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्प
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 28, 2024 03:52 PM2024-06-28T15:52:07+5:302024-06-28T15:56:20+5:30
वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्पालाही मंजुरी
सिंधुदुर्ग : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प घोषित करून सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना मोठे गिफ्ट दिले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्प, वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी आणि उद्योग ट्रेनिंग सेंटर प्रकल्पातून १० हजार तरूणांना रोजगार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले आहेत.
विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. कोकणासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अजितदादांनी मोठ्या प्रकल्पांची घोषणा करून कोकणवासियांची यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारण्यात येणार असून यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या स्कुबा डायविंग सेंटरच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्पावरून मोठे वादळ उठले होते. हा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प वेंगुर्ला येथेच होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यावेळी जाहीर केले होते. आता वेंगुर्ला येथील याच पाणबुडी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे
माजी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मंजूर केले होते. या केंद्रासाठी देखील भरीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर असलेल्या कातळ शिल्पांच्या संवर्धनासाठी युनेस्कोकडे पाठपुरावा करणार असल्याचेही अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. रत्नागिरी, सिंधुदुर्गात ४३० खाटांचे रुग्णालय उभारणार असल्याचे अजितदादांनी जाहिर केले.