सावंतवाडी : नारायण राणे हे दुस-यांचे पक्ष विसर्जित करण्यास निघाले होते. पण आता त्यांनाच स्वत: चा पक्ष विसर्जित करावा लागला. हा सर्व नियतीचा खेळ असून, माझी लढाई ही प्रवृत्तीशी आहे. जर भविष्यात राणेंना भाजपाच्या विचारमंथन शिबिरात सहभागी करून घेतले आणि त्यांची विचारधारा बदलली तर त्यांच्याशी असलेला माझा राजकीय संघर्षही संपेल, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. मंत्री केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अनेक पक्ष संपविण्याची घोषणा केली. शिवसेना विसर्जित करण्याची घोषणा केली. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. त्यांना भाजपसारख्या पक्षात प्रवेश मिळावा म्हणून अडीच वर्षे वाट बघावी लागली. अडीच वर्षांनंतर त्यांना स्वत: चा पक्षही विसर्जित करावा लागला, यासारखे दुर्दैव ते काय, असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला.जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. तुम्ही माझ्या विरोधात काय ते एकत्र या, पण सावंतवाडीत त्याचा काही उपयोग होणार नाही, असे मतही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले. माझी लढाई ही राणेंशी व्यक्तिगत नाही. कोणत्याही घटनेवरून त्यांच्या कुटुंबात भावा-भावात वाद व्हावा ही अपेक्षा माझी मुळीच नाही. मी कुटुंंब फोडून राजकारण करणारा नाही. सावंतवाडीत तेवढी संस्कृतता बाळगली जाते. माझी लढाई ही प्रवृत्तीशी आहे.राणे सर्वसामान्य जनतेला देत असलेल्या त्रासाविरोधात होती. पण आता ते भाजपात प्रवेश करत आहेत. ते भाजपाचे सदस्य झाले आहेत. त्यांनी आता भाजपाची विचारधारा स्वीकारावी. भाजपाने त्यांना विचारमंथनाचे धडे द्यावेत, त्यातून असलेला राग नाहीसा होईल. त्यानंतरच माझा राणेंशी असलेला राजकीय संघर्ष संपेल, असे मत यावेळी मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.
Maharashtra Election 2019: राणेंना भाजपाने विचारमंथनाचे धडे द्यावेत- दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 6:36 PM