कणकवली: काही मिळवण्यासाठी नव्हे, तर माझे उरलेले आयुष्य कोकणाच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी लागावे, माझ्या अनुभवाचा फायदा येथील विकासाला व्हावा, या दृष्टीने मी भाजपामध्ये प्रवेश केला, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. कणकवलीतल्या सभेत ते बोलत होते. दरम्यान ज्या पक्षात मी जातो, त्या पक्षात व त्या पक्षाच्या ध्येय-धोरणाशी मी निष्ठावान राहतो. फार विचार करून या पक्षात प्रवेश केला आहे आणि गेले अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे, असंही राणेंनी सांगितले आहे.
तर त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेशी माझा काहीही संबंध नाही, मी भाजपात आहे. भाजपात प्रवेश घेऊन ताससुद्धा झाला नाही. मी शिवसेनेला विचारात घेत नाही. मी त्यांची दखलही घेत नाही. सेना कुठेही असली तरी आम्हाला फरक पडत नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्या किंवा इतर कोणतंही पद द्या, त्याच्याशी काही कर्तव्य नाही, असं म्हणत नारायण राणेंनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीर आहे. नितेशच्या पाठीमागे खंबीर आहे. तर मला चिंता करायचा प्रश्नच येत नाही. मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघात भाजपा पुरस्कृत उमेदवार आहेत, दोन्ही निवडून येतील, अशी परिस्थिती आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेलाही डिवचलं आहे. प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न आहे, आपण काय आश्वासनं दिली होती. युतीचा बेस काय आहे, युती कशासाठी आहे. त्याची नीतिमत्ता प्रत्येकाननंच सांभाळली पाहिजे. मी महाराष्ट्रात काम करेन की दिल्लीत हे पक्षप्रमुख निर्णय घेतील. माझ्या पक्ष प्रमुखांचा प्रश्न आहे, हा भाजपाचा प्रश्न आहे, त्यांना माझा कुठे वापर करावा, त्याचा निर्णय तेच घेतील, असं नारायण राणे म्हणाले आहेत.