कणकवलीः शिवसेनेशी माझा काहीही संबंध नाही, मी भाजपात आहे. भाजपात प्रवेश घेऊन ताससुद्धा झाला नाही. मी शिवसेनेला विचारात घेत नाही. मी त्यांची दखलही घेत नाही. सेना कुठेही असली तरी आम्हाला फरक पडत नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्या किंवा इतर कोणतंही पद द्या, त्याच्याशी काही कर्तव्य नाही, असं म्हणत नारायण राणेंनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. ते कणकवलीत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीर आहे. नितेशच्या पाठीमागे खंबीर आहे. तर मला चिंता करायचा प्रश्नच येत नाही. मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघात भाजपा पुरस्कृत उमेदवार आहेत, दोन्ही निवडून येतील, अशी परिस्थिती आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेलाही डिवचलं आहे. प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न आहे, आपण काय आश्वासनं दिली होती. युतीचा बेस काय आहे, युती कशासाठी आहे. त्याची नीतिमत्ता प्रत्येकाननंच सांभाळली पाहिजे. मी महाराष्ट्रात काम करेन की दिल्लीत हे पक्षप्रमुख निर्णय घेतील. माझ्या पक्ष प्रमुखांचा प्रश्न आहे, हा भाजपाचा प्रश्न आहे, त्यांना माझा कुठे वापर करावा, त्याचा निर्णय तेच घेतील, असं नारायण राणे म्हणाले आहेत. कोकणात मुंबई आहे. शिवसेना महाराष्ट्रात आहे, प्रत्येक पक्षाला सभा घ्यायचा अधिकार आहे. मग काय झालं तिथे, आम्हाला काही फरक पडतोय का?, आताही फरक पडला का? नाही, शिवसेनेशी माझा काहीही संबंध नाही, असं म्हणत राणेंनी शिवसेनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली आहे.
Maharashtra Election 2019 : मी शिवसेनेची दखलच घेत नाही- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 4:00 PM