सावंतवाडी : एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक उजवे हात मानले जाणारे माजी आमदार राजन तेली यांनी पाच वर्षापूर्वी राणे पासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पाच वर्षानंतर सिंधुदुर्गचे राजकारण बदलले असून, राणे यांनीही काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी राणे हे गुरुवारी दुपारी अडीच वाजता सावंतवाडीत येत आहेत तब्बल पाच वर्षां नंतर राणे व तेली यांचे राजकीय संबंध जुळले असून, ते प्रथमच एकत्र येणार आहेत.
राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये दीपक केसरकर यांनी विजय मिळवलेला आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीमधून तर 2014 मध्ये शिवसेनेमधून ते विधानसभेत पोहोचले होते. यावेळी दीपक केसरकर यांच्यासमोर राजन तेली आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आव्हान आहे. मात्र मुख्य लढत ही केसरकरविरुद्ध तेली अशीच होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना भक्कम स्थितीत आहेत. गेल्या निवडणुकीत केसरकर यांनी या मतदारसंघात भाजपा उमेदवार असलेल्या तेलींचा 40 हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला सुमारे 29 हजार मतांची आघाडी मिळाली होती. मात्र मागच्या तुलनेत आघाडीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. त्यातच भाजपाचे बंडखोर असलेल्या राजन तेली यांना भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते आणि स्वाभिमानचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात युती नावापुरतीच उरली आहे. तसेच सावंतवाडीतील बबन साळगावकर हेही राष्ट्रवादीकडून लढत असल्याने दीपक केसरकर यांना मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. एकंदरीत चित्र पाहता येथे केसरकर आणि तेली यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत.