कणकवली/मुंबई - कणकवली मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका राणे कुटुंबीयांना जिव्हारी लागली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला नारायण राणे किंवा त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी कुठलेली थेट प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र चार हाडांचा बीएमसी चोर आणज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू, असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव द घेता लगावला आहे.
नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांना भाजपाने कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला आव्हान देत सतीश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पेटला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कणकवलीत झालेल्या प्रचारसभेमध्ये नारायण राणे आणि कुटुंबीयांवर जोरदार टीका केली होती. ''राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. शिवसेनेत होते त्यांना काढलं, काँग्रेसमध्ये होते त्यांना काढलं, आता शेवटचा पर्याय आहे, हा लढा सुसंस्कृत विरुद्ध खुनशी प्रवृती असा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. दरम्यान, शिवसेनेकडून कितीही टीका झाली तरी त्याला प्रत्युत्तर दिले जाणार नाही असा पावित्रा नारायण राणे आणि नितेश राणे यांनी घेतला होता. मात्र बुधवारी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर नारायण राणेंनेही शिवसेनेला इशारा दिला आहे. आम्ही कुणाचाही हिशेब बाकी ठेवत नाही, असे सांगत त्यांनी शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत.