मुंबई: सिंधुदूर्ग हे आता राज्यातील युतीचा केंद्रबिंदू बनले आहे. या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघांमध्ये युती तुटल्यात जमा असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नुकत्याच भाजमध्ये गेलेल्या मुलाच्या विरोधात शिवसेनेने एबी फॉर्म देत उमेदवार उभा केला आहे. याचबरोबर आधीच भाजपवासी झालेले माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत.
सतीश सावंत यांनी राणे पूत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात बंड करत स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेच्या एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल केली आहे. नितेश राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्याचवेळी संदेश पारकर यांनी कणकवली देवगड मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. आज संदेश पारकर यांनी फेसबूकवर त्यांचे बंडखोरी करण्यामागचे कारण सांगितले आहे.
अन्यायाविरोधात लढणे हा माझा स्वभाव आहे. माझी गेल्या २५ वर्षांची कारकीर्द फक्त कणकवलीच नाही, तर संपूर्ण जिल्ह्याने आणि तमाम महाराष्ट्राने पाहिली आहे. गेल्या काही भारतीय जनता पक्षात कार्यरत आहे, आणि पक्ष वाढीसाठी घेतलेली मेहनत देखील आपण सर्वांनी पाहिली आहे. भारतीय जनता पक्ष हा वटवृक्ष आहे, आमच्यासारख्या पारंब्या त्याचा विस्तार कसा आणि किती वाढवणार, हा प्रश्न आहेच. पण या वटवृक्षाला बांडगुळे चिकटू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र काही जिल्ह्यातील काही खुज्या नेत्यांमुळे ही बांडगुळे भारतीय जनता पार्टी नावाच्या वटवृक्षाला चिकटू पाहत आहेत, असा आरोप त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमेद जठार आणि नारायण राणे यांचे नाव न घेता केला.
तसेच या गुंडापुंडांची पोलखोल करण्यासाठी, त्यांच्या नादाला लागून मारामाऱ्या करणारे हात रोजगाराला लावण्यासाठी आपण विधानसभा लढणार असल्याचे पारकर यांनी म्हटले आहे. तसेच संदेश पारकर ना "साहेब" झाला, ना "नेता" झाला. . त्याची मालमत्ता एक चौरस फुटानेही वाढलेली नाही. त्याच्या नावावर कुठलेही "कंटेनर थिएटर" नाही. त्याच्या "म्युझिअम"चे भाडे थकलेले नाही, अशी टीकाही पारकर यांनी केली.