वैभववाडी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठपैकी केवळ कणकवली हा एकमेव मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असताना शिवसेनेने एबी फॉर्म देऊन महायुतीला तडा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर महायुतीने कारवाई करायला हवी, असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात जठार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, मंगेश गुरव, दिगंबर मांजरेकर, रत्नाकर कदम, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर आदी उपस्थित होते.
जठार पुढे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील आठपैकी कणकवली हा एकच मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला आहे. येथे कोण उमेदवार द्यायचा हा आमच्या पक्षाचा प्रश्न होता. परंतु शिवसेनेने विश्वासघात करीत सतीश सांवतांना एबी फॉर्म देऊन महायुतीला तडा देण्याचे काम उध्दव ठाकरे यांनी केले आहे.
सतीश सावंत यांची उमेदवारी ही बेकायदेशीर आहे. वेळ गेलेली नाही. शिवसेनेने अजूनही कणकवलीतून माघार घ्यावी. आम्ही उर्वरित दोन मतदारसंघातून अपक्षाची माघार घ्यायला तयार आहोत.राजन तेली व प्रमोद जठार यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. त्याबाबत विचारले असता हा फेक मेसेज असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत माझा पक्ष माझ्यावर कधीही कारवाई करणार नाही, असे जठार यांनी सांगितले.
पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा आदेश धुडकावून स्वत:ला पक्षाचे पदाधिकारी समजणारे अतुल रावराणे, संदेश पारकर, सभापती लक्ष्मण रावराणे आणि कणकवलीचे तालुकाध्यक्ष संदेश सावंत हे पक्षाच्या विरोधात काम करून निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत.
या चौघांच्या हकालपट्टीचा एकमुखी ठराव जिल्हा कार्यकारिणीत झाला असून तो आपण प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला आहे. १५ रोजी त्या चौघांवर कारवाईचा निर्णय होणार असल्याचे जठार यांनी सांगितले.नगरपंचायतीत पारकरांना सेनेने पाडलेकणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संदेश पारकरांसाठी पक्षाने अडीच कोटी रुपये खर्च केला. तरीही ते निवडून येऊ शकले नाहीत. कारण त्यावेळी पारकर यांना पाडण्यासाठी शिवसेनेची स्वाभिमानसोबत छुपी युती होती. हे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणाºया पारकरांना समजत नाही, असा गौप्यस्फोट प्रमोद जठार यांनी केला.