महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवारी कणकवलीत येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला राज्यसभा खासदार नारायण राणे व्यासपीठावर उपस्थित राहणार काय? आणि राणेंच्या रखडलेल्या भाजपा प्रवेशाबाबत मुख्यमंत्री काय भाष्य करणार ? याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
नारायण राणे यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर काही महिन्यात या पक्षाने केंद्रात भाजपला पाठिंबा दिला. भाजपने त्यावेळी राणे यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार केले. नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला शिवसेनेने त्यावेळी विरोध केला होता. त्यामुळे राणे भाजपाकडून राज्यसभेवर खासदार असतानाही लोकसभा निवडणुकीत त्यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी युतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात निवडणूक लढविली. ती निवडणूक लढवित असताना राणेंना भाजपाकडून रोखण्यात आले नाही. राणेंनी स्वाभिमान पक्षाकडून ही निवडणूक लढवून आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामात गुंतवून ठेवण्यासाठी ही निवडणूक लढविली होती. जर राणेंनी निवडणूक लढविली नसती तर बहुतांश कार्यकर्ते त्यावेळी इतर पक्षात जाण्याची शक्यताही होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस मधील नेते मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत. मात्र, असे असतानाही नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण रखडले आहे. त्यामागे शिवसेनेची आडकाठी मोठी आहे. आठ दिवसांपूर्वी नारायण राणेंनी आपला भाजप प्रवेश आणि पक्ष विलिनीकरण मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आपण आणखीन दहा दिवस वाट पाहणार आहोत. त्यानंतर आपला निर्णय जाहीर करू असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. तर याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडताना राणेंच्या प्रवेशासाठी आपण शिवसेनेशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राणेंच्या प्रवेश लांबला आहे.
नारायण राणेंना भाजपामध्ये घेतल्यानंतर शिवसेना भाजपाची युती राहील की नाही याबाबत शंका आहे. एकीकडे युती होणार म्हणून शिवसेना आणि भाजपाची नेतेमंडळी सगळीकडे जाहीर वक्तव्ये करत असली तरी असे अनेक मुद्दे आहेत की ते युतीसाठी पोषक नाही. त्यातीलच एक मुद्दा म्हणजे राणे प्रवेश. राणेंचा भाजपा प्रवेश होवू नये म्हणून काही जिल्ह्यातील भाजपा नेते प्रयत्नशील आहेत. तर काही जण मग भाजपासोडून शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांचे सर्व निर्णय राणेंच्या भूमिकेनंतर ठरणार आहेत. त्यामुळे राणेंबाबतीत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात. राणे मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर दिसतात काय? राणे काय बोलतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.