सिंधुदुर्ग - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कणकवलीतून नितेश राणे यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना कणकवलीत उमेदवार उभा करेल, असा इशारा शिवसेना नेते आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला होता. आता नितेश राणे यांनी त्यांना आव्हान दिले असून, तुम्ही बोलत राहा, तुमच्या बोलण्यामध्ये आमचा फायदा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक महिन्याभरावर आली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत असलेल्या संभ्रमामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आपण मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश करणार असून, कणकवलीमधून नितेश राणे हे भाजपाकडून निवडणूक लढवतील, असे नारायण राणे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाने नितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी दिल्यास शिवसेना त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करेल, असा इशारा दिला होता. तसेच मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना व्यासपीठावर घेतले नाही. याचा अर्थ भाजपाला राणेंना आपल्या पक्षात घ्यायचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यानंतर नितेश राणेंनी ट्विट करून नितेश राणेंवर पलटवार केला आहे. ''माननीय केसरकरजी तुम्ही बोलत राहा, तुमच्या बोलण्यामध्येच आमचा फायदा आहे. लगे रहो,'' असा टोला त्यांनी केसरकर यांना लगावला.
Vidhan Sabha 2019: तुम्ही बोलत राहा, तुमच्या बोलण्यामध्येच आमचा फायदा, नितेश राणेंचा केसरकरांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 10:37 AM
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - केसरकर आणि राणे यांच्यातील वाकयुद्धामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देसिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाला तोंड फुटले