कणकवली : मातोश्री हे आमचे दैवत तर सेनाभवन हे आमचे घर आहे. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबतच आहोत. कोकणला गद्दारीचा लागलेला कलंक कोकणातील आमच्यासारख्या आमदारांनी आज पुसला आहे. जे गेलेत ते निश्चित परत येतील. राज्यातील महाविकास आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन महाविकास आघाडीला धोका उद्भवणार नाही, असा निर्णय वरिष्ठ घेतील, अशा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेचे कुडाळ – मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे बुधवारी सकाळी श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने कणकवलीत दाखल झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते तातडीने मुंबईला रवाना होण्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, कोकणातील सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे आहेत. त्यामुळे जे कुणी गेलेले आहेत ते सर्वजण परत येतील, असा आपणाला ठाम विश्वास आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही काम करतो. त्यांचे आदेश माणून काम करतो म्हणून आम्ही निवडून येतो. त्यामुळे आमच्यासारखा कार्यकर्ता कायमस्वरूपी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे , असेही आमदार वैभव नाईक म्हणाले.केसरकरांबाबत तसा कोणताही प्रकार घडला नाहीमुंबईमध्ये एका हॉटेलमधून बाहेर पडताना शिवसैनिकांनी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना अडवले. या वृत्ताचा आमदार वैभव नाईक यांनी इन्कार केला. आमदार दिपक केसरकर व आपण एकत्रच होतो. उलट दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आहोत. त्यामुळे असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसेच मंगळवारच्या मुंबई येथील वर्षावरील बैठकीला किती आमदार होते ? यावर वरिष्ठच उत्तर देतील. मात्र , उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलेले आहे . त्यामुळे आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यासोबतच आहोत. तसेच महाविकास आघाडीला धोका उद्भवू नये , असा निर्णय वरिष्ठ घेतील . महाविकास आघाडीला धोका आहे, असे आपणाला वाटत नसल्याचे आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीला धोका उद्भवणार नाही, शिवसेना आमदाराने व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 4:29 PM