ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 1- अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पखवाज वादन परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवित कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथील महेश विठ्ठल सावंत यांनी पखवाज अलंकार हा अत्युच्च बहुमान मिळविला आहे. हा बहुमान मिळविणारे सिंधुदुर्गातील ते पहिलेच व्यक्तिमत्व ठरले आहेत.
लहानपणापासूनच महेश सावंत यांना संगीत कलेची असलेली आवड लक्षात घेवून प्रख्यात दशावतारी नटसम्राट बाबी कलिंगण व त्यांचे बंधू पांडुरंग कलिंगण यांनी त्यांना आपल्या जवळील तबला भेट दिला. त्यानंतर डॉ. दादा परब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी पखवाज वादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली.
सध्या महेश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या माध्यमातून पखवाज वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यांच्या अनेक शिष्यांनी पखवाज विशारद पदवी प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांना पखवाज वादन परीक्षा अभ्यासक्रम सोपा व्हावा या उद्देशाने 'मृदंग धा धा' हे पुस्तक महेश सावंत यांनी लिहून प्रकाशित केले आहे.
त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातून प्रथमच आणि पहिल्याच चाचणीत ऑल इंडिया रेडिओच्या परीक्षेत पखवाज वादनात थेट 'बी' ग्रेड प्राप्त करून सिंधुदुर्गच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने होणाऱ्या परीक्षांसाठी महेश सावंत हे परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर अनेक नावाजलेल्या भजनी बुवाना तसेच संगीत क्षेत्रातील कलाकाराना त्यांनी पखवाज साथ केली आहे. ढोलकी वादनाचीही त्यांची एक विशिष्ट शैली आहे.
पखवाज अलंकारसाठी पुणे येथे झालेल्या परीक्षेत त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यांचे गुरु पखवाज उस्ताद डॉ. दादा परब याना ते आपल्या यशाचे श्रेय देतात. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील तबला अलंकार सचिन कचोटे, तबला विशारद प्रमोद मुंडये, तबला उस्ताद हेमंत प्रभू, संगीत विशारद राजन माडये, तबला विशारद अरुण केळुसकर तसेच संगीत क्षेत्रातील इतर व्यक्ति, रसिक श्रोते, मित्र परिवार आणि आपल्या कुटुंबीयांमुळेच आपण हे यश मिळवू शकलो असे महेश सावंत विनयाने सांगतात. त्यांच्या यया यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.