माणगाव : माणगाव परिसरात पकडण्यात आलेल्या रानटी हत्तींना प्रशिक्षण देणे सुरु आहे. गुरुवारी या हत्तीवर माहूत स्वार झाला. हत्ती माणसाळले असल्याने त्यांचा वापर आता पर्यटनासाठी केला जाणार आहे. मात्र, आठवडाभरात डॉ. उमाशंकर या हत्तींची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.माणगाव खोऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या तिन्ही रानटी हत्तींना फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यात डॉ. उमाशंकर यांच्या टिमने जेरबंद केले व या तिन्ही हत्तींना प्रशिक्षण देण्यासाठी राघवेंद्र, नवीन, रामाप्पा, हेमंत व व्यंकटेश हे पाच माहूत आंबेरी येथे तैनात ठेवण्यात आले आहेत. राघवेंद्र ‘भीम’ या हत्तीला प्रशिक्षण देतो, नवीन ‘समर्थ’ या हत्तीला व रामाप्पा ‘गणेश’ या हत्तीला प्रशिक्षण देतो व त्यांच्या मदतीला हेमंत व व्यंकटेश आहेत. या रानटी हत्तींना ज्या क्रॉलमध्ये बंदिस्त केले आहे त्यातच एक दुसरा भाग लाकडे टाकून तयार करण्यात आला आहे. त्यात माहूत जाऊन वेगवेगळ््या सूचना देतात. पायाच्या हालचाली करणे, अशा सूचना माहूतकडून देण्यात येतात.बुधवार १ एप्रिलपासून प्रत्येक क्रॉलमध्ये लाकडे टाकून दोन विभाग करण्यात आले व ‘समर्थ’ या हत्तीच्या पाठीवर ‘नवीन’ माहूत चक्क स्वार झालाय. दोन महिन्यांच्या आत रानटी हत्तीला प्रशिक्षण देऊन स्वार होण्याचा पहिला मान नवीनने मिळविला. रानटी हत्ती माणसाळल्याची ती एक प्रमुख खूण आहे. आता हळूहळू तिन्ही हत्ती सूचनांचे पालन करताना दिसतात. येणाऱ्या आठवड्यात डॉ. उमाशंकर आंबेरीत येऊन पाहणी करतील व त्यानंतरच पुढची प्रशिक्षणाची दिशा ठरविली जाईल, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
रानटी हत्तींवर माहुताची स्वारी
By admin | Published: April 03, 2015 10:10 PM