रत्नागिरी : शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर शालेय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार जिल्ह्यातील १५ शाळांची स्वत: तपासणी करणार आहेत. ही तपासणी महिनाभरात करण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी दिली.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी आदिंनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार हेही उपस्थित होते. यावेळी शिक्षणमंत्री तावडे यांच्याशी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक प्रश्न, अडचणींबाबत या शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यामध्ये जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील ९ तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांपैकी केवळ चार पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित पाच पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम शैक्षणिक विकासावर होत आहे. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली. जिल्ह्याच्या एकूणच शैक्षणिक स्थितीचा आढावा शिक्षणमंत्र्यांनी यावेळी घेतला. त्यानंतर त्यांनी मुख्य सचिव नंदकुमार यांना जिल्ह्यातील शाळा तपासणीच्या सूचना दिल्या. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या १५ शाळा तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्य सचिव स्वत: शाळांना भेटी देणार आहेत. हा भेटीचा कार्यक्रम महिनाभराच्या कालावधीत होणार आहे. त्याचबरोबर यावेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक पदावनतीचा महत्त्वाचा मुद्दा उपाध्यक्ष शेवडे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे मांडला. त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी मुख्याध्यापकांना पदावनत न करण्याच्या मुद्द्याला मान्यता दिली आहे. त्याचबरोबर या मुख्याध्यापकांनी उपशिक्षकांप्रमाणेच अध्यापकाचेही काम करावे, अशीही सूचना त्यांनी दिला. अशा प्रकारे शिक्षणमंत्र्यांसमोर जिल्ह्यातील विविध समस्या मांडण्यात आल्या. (शहर वार्ताहर)
मुख्य सचिव जिल्ह्यातील १५ शाळा तपासणार
By admin | Published: August 08, 2016 10:37 PM