कणकवली : शहरात निर्माण होणाऱ्या विविध समस्या लक्षात घेत विकासाच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली. राणे यांनी सोमवारी नगरपंचायतीला भेट दिली. यावेळी नगराध्यक्षा अॅड.प्रज्ञा खोत, उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी राणे यांना व्यापाऱ्यांनी विविध समस्यांसंदर्भात निवेदन दिले. शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, व्यापाऱ्यांचे प्रश्न, इमारतींचे प्रश्न आदी प्रश्नांचे वाढत्या शहराच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे असल्याचे राणे यांनी सांगितले. महामार्गाचे रूंदीकरण होत असून त्यामुळे महामार्गाशेजारील व्यापारी विस्थापित होत आहेत. त्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रश्न आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकारी, मंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले आहे. वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असे राणे यांनी सांगितले. शहरातील फिरत्या विक्रेत्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नियमाप्रमाणे समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुख्याधिकाऱ्यांसह पाच सदस्यांचा समावेश आहे. मात्र, अद्याप या समितीची बैठक झालेली नाही. या समितीनेच फिरत्या विक्रेत्यांसंदर्भात शुल्क आकारणे, त्यांचे झोन आदी निश्चिती करायची आहे. यासंदर्भात नगरपंचायत बैठकीत ठराव घेऊन लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना राणे यांनी दिल्याची माहिती अॅड. खोत यांनी दिली. परप्रांतीय व्यापारी शहरात येत आहेत. परप्रांतीय व्यापारी मुजोरपणा करत असल्याने काही वेळा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. परप्रांतीय व्यापाऱ्यांना देण्यात येणारे दाखले काटेकोरपणे द्यावेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या. (प्रतिनिधी) पथदीपांना ‘टायमर’ बसविणार : नगराध्यक्षा वीज बचत करण्यासाठी शहरातील पथदीपांना एलइडी दिवे बसवण्यात आले आहेत. आता सर्व पथदीपांना ‘टायमर’ आणि वीज मीटर बसवण्यात येणार आहेत. ज्यामुळे फक्त आवश्यक त्या वेळी पथदीप सुरू होऊन आपोआप बंद होतील. यामुळे वीजेचा अपव्यय टळणार आहे, असे कणकवलीच्या नगराध्यक्षा अॅड. खोत सांगितले.
शहर विकासाचे सूक्ष्म नियोजन करा
By admin | Published: January 19, 2015 11:26 PM