कुडाळ : जिल्ह्याचा विकास हा प्रत्येकाच्या मेहनतीतून होणार असून मेहनत करा. नैराश्य येऊ देऊ नका, बँकांच्या सहकार्याने आर्थिक मदत घेऊन उद्योग व्यवसायातून प्रगती साधा. निर्माण केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध आम्ही करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कुडाळ येथील हॉटेल कोकोनटमध्ये शनिवारी स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान सिंधुदुर्गतर्फे बँक आॅफ इंडिया प्रायोजित प्रशिक्षित बेरोजगारांसाठी मार्गदर्शन व कर्ज वितरण मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. केसरकर म्हणाले, आपण जो व्यवसाय निवडतो त्याची गरज किती आहे ती तपासली पाहिजे. व्यवसायातून नफा मिळाला पाहिजे. त्यामुळे व्यवसाय करताना बाजारपेठेत काय गरजेचे आहे ते ओळखले पाहिजे, असा सल्ला केसरकर यांनी दिला.यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, बँक आॅफ इंडियाचे महाप्रबंधक आर. एस. चौहान, बँक आॅफ इंडियाचे कोकण झोनल मॅनेजर विनायक बुचे, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे पी. आर. नाईक उपस्थित होते. नाईक म्हणाले, सध्या नोकऱ्या मिळणे ही कठीण बाब बनली आहे. नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय उद्योगातून प्रगती साधा. याकरिता जिल्ह्यात विविध व्यवसाय उद्योगाचे प्रशिक्षण आमची संस्था देत आहे. तसेच व्यवसाय उद्योगासाठी कर्जाच्या सुविधाही उपलब्ध करून देते. यावेळी प्रशिक्षित बेरोजगारांना केसरकर यांच्या हस्ते कर्जमंजुरीची नियुक्तीपत्रे दिली. प्रशिक्षित बेरोजगार, बँकांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बँकांची मदत घेऊन व्यवसायात प्रगती करा
By admin | Published: November 08, 2015 11:27 PM