मालवण : अडीच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामफलकावरून तारकर्ली-देवबागवासियांमध्ये वाद निर्माण झाला असताना व या वादात तोडगा न निघाल्याने आपण यात भरडले जाणार याची कल्पना एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना आल्याने या नामफलकावरील तारकर्ली देवबाग ही दोन्हीही गावांची नावे काढून टाकीत नामफलकावर मालवण असे नाव सुंदर हस्ताक्षरात कोरण्यात आले आहे. हे करीत असतानाच हा स्कुबा डायव्हिंग सेंटरचा नामफलक हिरव्या रंगाच्या कपड्याने झाकून ठेवण्याची मखलाशीही एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. मालवण नाव असणारा हा नामफलक एमटीडीसीच्या अधिकृत वेबसाईटवर दोन दिवसांपूर्वी प्रसारीत करण्यात आला आहे.यासंबंधीची अधिक माहिती अशी की, तारकर्ली देवबागच्या सीमेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्कुबा डायव्हिंग सेंटरची उभारणी केली असून पूर्णत्वास गेलेल्या या इमारतीचे उद्घाटन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. मात्र तत्पूर्वी एमटीडीसीने या स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामफलकावर देवबाग तारकर्ली असा उल्लेख केला. या उल्लेखामुळे तारकर्ली देवबाग गावामध्ये वादाची ठिणगी पडली व तारकर्ली येथे हे स्कुबा डायव्हिंग सेंटर असल्याने देवबाग नावाचा उल्लेख टाळावा अशी भूमिका तारकर्लीवासियांनी घेतली होती. तर पर्यटनदृष्ट्या देवबाग गाव महत्वाचे असल्याने देवबागचे नाव काढून टाकण्यात येवू नये अशी भूमिका देवबागवासियांनी घेतली.या वादामुळे स्कुबा डायव्हिंगचे उद्घाटन रखडले. नामफलकाच्या वादात आपण भरडले जाणार याची कल्पना एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना आली. या वादावर पळवाट म्हणून एमटीडीसीच्या नवीनच शक्कल लढवली असून नामफलकावरील कोरण्यात आलेल्या देवबाग व तारकर्ली या दोन्ही गावांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. या नामफलकावर स्कुबा डायव्हिंग सेंटर मालवण असे सुंदर हस्ताक्षरात कोरण्यात आले आहे. हा फलक सेंटरच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. या फलकावर हिरव्या रंगाचे कापड लावून हा नामफलक झाकून ठेवण्यात आला आहे. मात्र हे करीत असताना एमटीडीसीने आपल्या वेबसाईटवर प्रवेशद्वारावर लावलेला नामफलक प्रसारीत केला आहे. त्यामुळे आता देवबाग, तारकर्लीवासिय कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
स्कुबा डायव्हिंग सेंटरवर ‘मालवण’चा नामफलक
By admin | Published: April 06, 2015 11:11 PM